Raj Thackeray : हिंदी सक्तीचा निर्णय अखेर घेतल्यानंतर राज ठाकरे यांची मोठी प्रतिक्रिया

By: Editor_Pratik

On: Sunday, June 29, 2025 2:40 PM

rajT
Google News
Follow Us

मुंबई : राज्य सरकारने अखेर इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या निर्णयाला फाटा दिला असून, यासंदर्भातील दोन्ही शासन निर्णय (जीआर) रद्द करण्यात आले आहेत. यामुळे मराठी जनतेच्या सातत्यपूर्ण संघर्षाला यश आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयाचे स्वागत करत मराठी जनतेचे अभिनंदन केले आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या परखड भाषणात स्पष्ट केले की, हा निर्णय सरकारने उशिराने घेतला असला तरी तो केवळ जनतेच्या रेट्यामुळेच शक्य झाला आहे. “हिंदी सक्तीला मराठी जनतेने चोख उत्तर दिले. सरकारला याचा गंभीर धसका बसला आणि अखेर निर्णय मागे घ्यावा लागला,” असे त्यांनी सांगितले.

मनसेने एप्रिल २०२५ पासून तीन भाषा सक्तीविरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर अनेक राजकीय पक्ष आणि संघटना या मुद्द्यावर एकवटल्या. मनसेच्या पक्षविरहित मोर्चाची घोषणा झाल्यानंतर, या आंदोलनाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले होते. “हा मोर्चा जर प्रत्यक्षात उतरला असता, तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली असती,” असे ठाकरे म्हणाले.

सरकारने नव्याने एक समिती स्थापन केल्याच्या निर्णयावरही राज ठाकरे यांनी कडाडून टीका केली. “समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको, अशा प्रकारांना पुन्हा खपवून घेतले जाणार नाही. हे सरकारने कायम लक्षात ठेवावं,” असा इशारा त्यांनी दिला.

मराठी भाषेच्या अस्मितेचा प्रश्न ऐरणीवर आला तेव्हा मराठी जनतेने एकजुटीने सरकारला झुकवले, हे कौतुकास्पद असल्याचे सांगून त्यांनी पुढे म्हटले, “आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या भाषेसाठी आपल्यालाच लढावं लागतंय. ही लढाई अजून संपलेली नाही. आता मराठी भाषा ज्ञानाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा व्हावी, हीच आपली भूमिका असायला हवी.”

राज ठाकरे यांनी शेवटी पुन्हा एकदा राज्यातील सर्व मराठी जनतेचे अभिनंदन करत त्यांच्या एकजुटीचे कौतुक केले आणि या लढ्याचे श्रेय संपूर्ण महाराष्ट्राला दिले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026