अहमदाबाद : अहमदाबाद येथील Air India च्या फ्लाईट-171 विमानाचा अपघात ही एक हृदयद्रावक घटना आहे. या दुर्घटनेत २४२ पैकी केवळ एक प्रवासी बचावला, तर उर्वरित प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघाताने संपूर्ण देशाला धक्का बसला असतानाच, आता एका महिला ज्योतिषाचे भविष्य चर्चेचा विषय बनले आहे. या ज्योतिषाने काही दिवसांपूर्वीच एका मोठ्या विमान अपघाताचे भाकीत केले होते, आणि आता ते खरे ठरल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नियोजित वेळेला उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच Air India चे फ्लाईट-171 हे विमान एका इमारतीवर आदळले आणि त्यानंतर त्याचा स्फोट झाला. तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक अंदाज आहे. मात्र, ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल. या विमानात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हेदेखील प्रवास करत होते, आणि दुर्दैवाने त्यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.
या अपघातानंतर ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडियावर अॅस्ट्रो शर्मिष्ठा नावाच्या एका महिला ज्योतिषाची जोरदार चर्चा सुरू आहे. या महिलेने ५ जून रोजी एक ट्विट केले होते, ज्यात तिने एका मोठ्या विमान अपघाताचे भाकीत केले होते. तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते: “इस्त्रो ही भारताची अवकाश संशोधन संस्था जगाला आश्चर्याचा धक्का देणार आहे. या संस्थेकडून अवकाश, उपग्रह अभियांत्रिकी, अवकाश पर्यटन या क्षेत्रात आगामी काळात इस्त्रो चांगली कामगिरी करणार आहे. नक्षत्रांचा अभ्यास करून मी गेल्या वर्षी २०२५ साली विमान अपघात होईल, असे सांगितले होते. माझ्या या भाकितावर मी अजूनही ठाम आहे.”
https://x.com/AstroSharmistha/status/1930601830838366551
आता हेच ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी “या महिला ज्योतिषाचे भविष्य खरे ठरले” अशा भावना व्यक्त केल्या आहेत. हा केवळ योगायोग आहे की खरोखरच ही भविष्यवाणी होती, यावर आता चर्चा सुरू झाली आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातील या भेटीने अनेकांना आश्चर्यचकित केले आहे.
दरम्यान, या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मृतदेह जळालेले असल्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण झाले असून, नातेवाईकांना डीएनए नमुना देऊन ओळख पटवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे, आणि या अपघातामागील नेमके कारण काय होते, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.