PCMC Inclusion : हिंजवडीचा महापालिकेत समावेश होण्याच्या हालचाली, राज्य सरकारकडून हिरवा कंदील

PCMC Inclusion : यंदा पावसाळ्याच्या तोंडावर हिंजवडीत जलकोंडी झाल्याने सर्वच स्तरांमधून प्रशासनावर टीका झाली. या भागातील विविध प्रशासकीय विभागांमध्ये ताळमेळ नसल्याचा आरोपही झाला तर दुसरीकडे हिंजवडीला पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्याच्या मागणीनेही जोर धरला. या जनरेट्यामुळे राज्य सरकारने हिंजवडीला पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. याबाबतची प्रक्रियाही लवकरच सुरू होईल, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

महाराष्ट्र शासनाकडून 2019-23 चे पत्रकारिता पुरस्कार जाहीर; मंगेश वैशंपायन यांची ‘अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रीय पुरस्कार’आणि निवेदिता खांडेकर यांची ‘अनंत गोपाळ शेवडे पुरस्कारासाठी निवड

हिंजवडीसाठी कोणतीही स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा नसल्याने हा भाग महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण, हिंजवडी ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग या विविध विभागांच्या हद्दीत येतो. या यंत्रणांमध्ये अनेकदा समन्वयाचा अभाव दिसून येतो. त्यामुळे वर्षानुवर्षे येथील कामे रखडली आहेत. एका बाजूला चकचकीत आयटी पार्क, उच्चभ्रू सोसायटी व दुसरीकडे येथे असणारा पायाभूत सुविधांचा अभाव हे चित्र गेल्या वीस वर्षांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा भाग महापालिका हद्दीत समाविष्ट केला जावा, ही मागणी जोर धरत आहे. त्यामुळे आता प्रशासनही कामाला लागले आहे.

हिंजवडीसह गहुंजे, जांबे, मारुंजी, हिंजवडी, माण, नेरे, सांगवडे ही गावे पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव २०१५ मध्ये प्रथम मांडण्यात आला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला. या प्रस्तावावर शासनाने अनेकदा माहिती मागवली. मात्र, त्यानंतरही हा प्रस्ताव राज्य सरकारकडे धूळखात पडून आहे. दुसरीकडे महापालिकेत समावेश झाल्यास येथील कारभारावर महापालिकेचा पगडा राहील, यामुळे स्थानिकांकडून याला विरोधही होत आहे.

हिंजवडीसारख्या नामवंत आयटी पार्क लगत राहणाऱ्या अनेक सोसायटीधारकांना रस्ते, पिण्याचे पाणी, घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या पायाभूत सुविधा अद्यापही मिळालेल्या नाहीत. पाण्यासाठी पावसाळ्यातही येथील नागरिकांना टॅंकरवर अवलंबून राहावे लागत आहे. तर; रस्ते, पदपथ, पथदिवे या सुविधांचाही येथे अभाव दिसून येत आहे. त्यामुळे विलीनीकरण झाल्यास पायाभूत सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असे आयटीयन्सचे मत आहे.

हिंजवडीचा महापालिकेत समावेश व्हावा, यासाठी येथे काम करणाऱ्या आयटीयन्सनी अनलॉग हिंजवडी ही सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. दोनच दिवसांत या मोहिमेमध्ये १६ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग घेतला आहे. या मोहिमेची चर्चा सध्या सोशल मिडीयावर सुरू असून, आठ दिवसांनी या मोहिमेत नोंदविण्यात आलेल्या स्वाक्षऱ्या मुख्यमंत्र्यांसमोर सादर केल्या जाणार आहेत. तेव्हाही हिंजवडीचा पिंपरी चिंचवड महापालिकेत समावेश करावा, हीच मुख्य मागणी मांडली जाणार आहे.

स्थानिकांचा का होतोय विरोध…

  1. या भागातील मोकळ्या जागांवर महापालिकेचे आरक्षण पडण्याची भीती

  2. महापालिकेत समाविष्ट गावांमध्ये विकास होण्यात दिरंगाई

  3. महापालिकेचा अंकुश येण्याची स्थानिकांना भीती

  4. जमिनींना योग्य मोबदला न मिळण्याची शेतकऱ्यांना भीती