पत्रकारांवर खोट्या गुन्ह्यांची नोंद; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आक्रमक

By: Editor_Pratik

On: Monday, June 23, 2025 3:48 PM

Google News
Follow Us

पोलीस उपमहानिरीक्षक मा. सुरेशजी मेंगडे यांना मुंबई येथे निवेदन सादर | पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या निलंबनाची व चौकशीची मागणी!

मुंबई : लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेला वेठीस धरण्याचे सध्या प्रयत्न सुरू असून निर्भीडपणे अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना दडपण्याचा प्रकार समोर येत आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात घडलेल्या अशाच एका प्रकारामुळे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आक्रमक झाला असून, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या वतीने पोलीस उपमहानिरीक्षक मा. सुरेशजी मेंगडे यांना आज मुंबई येथे निवेदन देण्यात आले.

या निवेदनात सांगण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. किशोर रायसाकडा, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाने, पदाधिकारी राकेश सुतार आणि कुंदन बेलदार यांच्यावर खंडणीचा खोटा गुन्हा पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. या सर्व पत्रकारांनी पाचोरा तालुक्यातील सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात सातत्याने बातम्या प्रकाशित केल्या होत्या. परिणामी, अनेक बेकायदेशीर व्यवहार बंद पडले आणि पोलिसांच्या हप्तेखोरीवरही आळा बसला.

यामुळे चिडलेल्या पाचोरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक अशोक कचरू पवार आणि अवैध धंद्यांचा आका भोला उर्फ शेखर पाटील यांनी संगनमत करून खोट्या आरोपांची योजना रचली, असा गंभीर आरोप पत्रकार संघाने केला आहे. अवैध धंद्यांमुळे मोठ्या प्रमाणात मिळणारा हप्ता बंद झाल्याने बदला घेण्याच्या हेतूने या पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, अशी भूमिका संघाने मांडली.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने पुढील मागण्या निवेदनात मांडल्या आहेत:

1. हप्तेखोरीचे आरोप असलेले पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना तात्काळ निलंबित करावे.

2. अशोक पवार आणि त्यांच्या कुटुंबियांनी हप्तेखोरी व अवैध मार्गाने कमावलेली संपत्ती याची सखोल चौकशी करण्यात यावी.

3. भोला उर्फ शेखर पाटील याच्यावर आधीपासून अनेक गुन्हे दाखल असून, त्याला पाचोरा तालुक्यातून हद्दपार करण्यात यावे.

4. पत्रकारांवर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत.

5. पोलीस विभागाने अशा प्रकरणांत फक्त अर्जाच्या आधारे गुन्हे दाखल न करता, प्रथम तपास करावा आणि संबंधित पत्रकारांना विश्वासात घेऊन चौकशी करावी.

या निवेदनावर राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, प्रचारक संजय फुलसुंदर, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण, मंत्रालय संपर्कप्रमुख विष्णू भुरे, प्रवीण थोरात, जेष्ठ पत्रकार भीमराव सावंत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

जर मागण्या मान्य न झाल्यास, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

पत्रकार हा समाजाचा आरसा असून, तेच खोट्या गुन्ह्यांच्या माध्यमातून झाकले जात असतील तर ही बाब अत्यंत गंभीर असून संपूर्ण पत्रकार बिरादरीने या प्रकाराचा निषेध केला आहे. यापुढे असे प्रकार टाळण्यासाठी पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संघ एकवटून लढणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026