पुरुषांच्या वेदनांकडे डोळेझाक का? – मानसिक आरोग्य आणि आत्महत्या या विषयावर समर्पक प्रश्न
पुणे : समाजात एखादी स्त्री आत्महत्या करते तेव्हा संपूर्ण समाज तिच्या वेदनांवर, परिस्थितीवर, अत्याचारावर आणि सामाजिक दबावावर चर्चा करतो. तिच्या बाजूने महिला आयोग, सामाजिक संस्था, माध्यमं उभी राहतात. पण जेव्हा एखादा पुरुष आत्महत्या करतो, तेव्हा ती घटना एका कोपऱ्यात छोटीशी बातमी बनून राहते आणि काही क्षणातच विसरली जाते.
पुरुषांच्या आत्महत्या का दुर्लक्षित राहतात? पुरुषांच्या मानसिक आरोग्यावर चर्चा का होत नाही? अशा अनेक प्रश्नांवर भाष्य करणारा एक संवेदनशील आणि विचारप्रवर्तक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
या व्हिडिओत म्हटलं आहे की, “पुरुषांनाही भावना असतात, वेदना असतात, पण त्यांना व्यक्त होण्याची मुभा नाही. ‘तू मुलगा आहेस, रडायचं नाही’ असं लहानपणापासूनच शिकवलं जातं.” त्यांना आर्थिक जबाबदाऱ्या, कुटुंबाची काळजी, समाजाच्या अपेक्षा या सर्व ओझ्याखाली स्वतःच्या भावनांचा गळा घालावा लागतो.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRB) आकडेवारीनुसार, देशात आत्महत्या करणाऱ्यांपैकी ७० टक्क्यांहून अधिक पुरुष असतात. तरीही समाज त्याच्या वेदनांबाबत गप्प का असतो?
पुरुष आयोगाचा अभाव, मानसिक आधाराचा नाही संवाद
स्त्रियांकरता महिला आयोग, अनेक संस्था आणि माध्यमं सक्रिय असतात. पण पुरुषांसाठी अशा कोणत्याही यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत नाहीत. “पुरुष आयोग” अशी संकल्पना अनेकांना ऐकूनसुद्धा माहिती नाही.
आज अनेक पुरुष मानसिक तणाव, अपयश, कौटुंबिक भांडणं, घटस्फोट, मूलांपासून दुरावणं यामुळे तणावाखाली असतात. मात्र त्यांच्याकडे कोण ऐकणार?
समाजाला समजूतदारपणा दाखवण्याची वेळ
हा विषय फक्त चर्चेचा नाही, तर समाजात एक सकारात्मक बदल घडवण्याचा आहे. पुरुषांसोबत सहानुभूतीने वागणं, त्यांच्या भावनांना मान्यता देणं आणि त्यांना मानसिक आधार देणं – ही काळाची गरज आहे.
जर तुमच्या आसपास एखादा पुरुष गप्प असेल, एकटेपणात असेल, निराश असेल – तर त्याला ऐका. त्याचं म्हणणं समजून घ्या. कारण एक छोटीशी सहानुभूती एखाद्याचं जीवन वाचवू शकते.
समाजाला संवेदनशील बनवण्यासाठी हे विचार सर्वांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. अशा विषयावर चर्चा होणे हे मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं.