Container Accident : क्लासला जाताना कंटेनरच्या धडकेत बारावीचा मुलगा जागीच ठार; घटनास्थळी मोठा रक्तस्त्राव, डोक्याला गंभीर मार लागला अन्..
नागाव : कंटेनरच्या धडकेत (Container Accident) टोपचा मोपेडस्वार मुलगा जागीच ठार झाला. उत्कर्ष सचिन पाटील (वय १७, रा. महाडिक कॉलनी, टोप, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. शिये – कसबा बावडा मार्गावर (Shiye-Kasba Bawda Marga) शिरोली औद्योगिक वसाहतीमधील मोहिते गॅरेजसमोर दुपारी साडेतीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, उत्कर्ष पाटील हा बारावीचे शिक्षण घेत होता. खासगी क्लाससाठी दुपारी साडेतीनच्या सुमारास तो मोपेडवरून टोपहून कसबा बावड्याकडे निघाला होता. शिये – कसबा बावडा मार्गावर शिरोली एमआयडीसी येथील मोहिते गॅरेजसमोर आला असता समोरून येणाऱ्या कंटेनरची मागील बाजू नकळत मोपेडला धडकली.
यामध्ये उत्कर्षचे मोपेडवरील नियंत्रण सुटल्याने तो रस्त्यावर आपटला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी मोठा रक्तस्त्राव झाला होता. अपघातानंतर उत्कर्षचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आला. अपघाताची माहिती मिळताच नातेवाइकांनी व मित्रांनी दवाखान्यात गर्दी केली होती. उत्कर्षच्या मागे आई-वडील आणि लहान भाऊ आहे.
शिये फाटा ते पंचगंगा नदी मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. डांबरीकरणही झाले आहे; पण वाहतुकीस धोकादायक विद्युत खांब रस्त्याच्या मधोमध आहेत. हे खांब चुकविण्यासाठी अनेक वेळेस वाहनधरकांना रस्त्याच्या विरुद्ध बाजूने वाहने चालवावी लागतात. उत्कर्ष पाटील हा त्याचाच बळी ठरला.