अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखा, नव्या जुन्या रंगकर्मींसाठी सतत नवे नवे उपक्रम आयोजित करून सर्वांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे कार्य करत असते. त्याचबरोबर कलाकारांच्या अडी – अडचणीच्या वेळी त्यांना अनमोल सहकार्य करत असते. यावर्षीपासून, रंगकर्मींना नवे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आणि त्यांना अडी – अडचणीच्या वेळी त्यांना अनमोल सहकार्य करता यावे या उद्देशाने, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखा, एक दीर्घांक स्पर्धा भरवत आहे. ही स्पर्धा, ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ असेल. ज्याचे नांव शरद तळवलकर स्मृती करंडक दीर्घांक स्पर्धा २०२५* असे असेल.
ही स्पर्धा प्राथमिक फेरी आणि अंतिम फेरी अशा दोन टप्प्यात होईल. स्पर्धेच्या प्राथमिक फेरी साठी भाग घेणाऱ्या प्रत्येक संघाने त्याच्या दीर्घांकाचं, व्हिडिओ शूटिंग करून त्याचा पेन ड्राइव्ह आयोजकांकडे पाठवायचा आहे. हे शूटिंग तालीम स्वरूपातील असेल तरीही चालू शकेल. ते अगदी साध्या पद्धतीने दिवसा उजेडी शूट केलेलं असावं. दोन किंवा तीन कॅमेरा सेटअप लावून शूट केलेलं किंवा एडिटिंगच्या खूप कलृप्त्या वापरून केलेलं शूटिंग नसावं. सादरीकरण कमीत कमी ७५ मिनिटांचे आणि जास्तीत जास्त ९० मिनिटांचे असावे. प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी १५ संघ निवडले जातील आणि अंतिम फेरी २६ मे ते ३० जून २०२५ रोजी भरत नाट्य मंदिर पुणे येथे होईल.
प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ एप्रिल असून पेन ड्राईव्ह पोहचविण्याची अंतिम तारीख २० एप्रिल आहे. स्पर्धेचे प्रवेश शुल्क – ३,०००/- रुपये इतके असून सांघिक प्रथम पारितोषिक ५०,०००/- रुपये आणि करंडक असे आहे. एकूण सांघिक ५, वैयक्तिक २८ पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे फॉर्म आणि इतर चौकशीसाठी विजय पटवर्धन ९८२२२५२९१२ यांना संपर्क करावा असे आवाहन पटवर्धन यांनी केले आहे.