‘उजास’ आणि पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम
‘उजास’ आणि पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व स्वयंसेवकांच्या सहकार्याने १६ ते २५ वयोगटातील सुमारे एक हजार तरूणींना मासिक पाळीचे आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करणाऱ्या वॉल पेंटिंग उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले. मासिक पाळीशी संबंधित मिथक आणि गैरसमजांना आव्हान देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
‘उजास’ हा आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या अद्वैतेश बिर्ला यांच्या पुढाकाराने राबविण्यात येणारा उपक्रम आहे. पुण्याच्या आजूबाजूच्या ग्रामीण आणि निमशहरी भागात विविध क्षेत्रात प्रगती झाली असली तरी मासिक पाळीशी संबंधित गैरसमज प्रचलित आहेत. त्यामुळे मुलींमध्ये शाळेत गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढत आहे. मासिक पाळीबाबतच्या आरोग्यविषयक जागरुकतेचा अभाव, कलंक आणि सॅनिटरी प्रॉडक्ट्सच्या अपुऱ्या उपलब्धतेमुळे भारतात दरवर्षी सुमारे २३ दशलक्ष मुली शाळा सोडतात, असे संशोधनात आढळले आहे. विद्यार्थी आणि स्वयंसेवकांनी कॉलेजच्या बाहेरील भिंतींचे रूपांतर परिवर्तनासाठीच्या कॅनव्हासमध्ये करत मासिक पाळीबद्दलचे मौन भंग करण्यासाठी आणि खुल्या संभाषणांना वाव देण्यासाठी एक साधन म्हणून कलेचा वापर केला.
हा उपक्रम ’उजास’च्या संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या प्रयासांचा भाग आहे. यात जागरूकता कार्यक्रमांच्या माध्यमातून आणि मासिक पाळीबाबत अभावाशी सामना करण्यासाठी ४६,७१,९०० सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप करून ती ४,३२,३२१ किशोरवयीन मुली, महिला आणि तरुण मुलांपर्यंत पोहोचली आहे. मासिक पाळीतील स्वच्छतेच्या उत्पादनांच्या अभावामुळे भारतातील पाचपैकी एका मुलीला तारुण्यानंतर शाळा सोडावी लागते, त्यामुळे शिक्षणातील स्त्री-पुरुष दरी आणखी वाढते. एकट्या पुण्यात ’उजास’ने १५,५९३ हून अधिक विद्यार्थिनींना प्रभावित केले आहे. चुकीची माहिती आणि सांस्कृतिक कलंक मासिक पाळीच्या आरोग्यविषयक संवादात अडथळे आणत असल्याने अशा प्रकारच्या हस्तक्षेपांची नितांत गरज अधोरेखित झाली आहे.
या उपक्रमाविषयी बोलताना उजास च्या संस्थापक अद्वैतेश बिर्ला म्हणाल्या, “मासिक पाळीबाबतच्या गैरसमज आणि निर्बंधांमुळे असंख्य मुली बंधनात पडतात व त्यामुळे त्यांची क्षमता आणि संधी मर्यादित होतात. हे चक्र मोडून काढण्यासाठी आपण उद्याचे चेंजमेकर असलेल्या तरुणांपासून सुरुवात केली पाहिजे. जेव्हा तरुण मने आजच्या कालबाह्य समजुतींना आव्हान देतील, तेव्हा भावी पिढ्या कलंकमुक्त होतील. कोणत्याही मुलीला तिच्या मासिक पाळीमुळे त्रास होणार नाही आणि अडथळ्यांशिवाय तिला तिच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचे स्वातंत्र्य असेल असा भारत हे माझे स्वप्न आहे. जागरूकता, मासिक पाळीशी संबंधित विनामूल्य उत्पादने उपलब्ध करून देणे आणि शाश्वतता या तीन स्तंभांवर ‘उजास’ उभी आहे.
‘उजास’च्या प्रमुख पूनम पाटकर म्हणाल्या, “मासिक पाळीचे आरोग्य आणि स्वच्छता व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी केलेल्या अथक सहकार्याबद्दल ‘पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, प्राचार्या डॉ. स्मिता सूर्यवंशी आणि विद्यार्थिनींचे आम्ही मनापासून आभारी आहोत. मासिक पाळीचे आरोग्य ही केवळ वैयक्तिक समस्या नाही – हा सार्वजनिक आरोग्याचा गंभीर मुद्दा आहे. भारतातील जवळपास ७१ टक्के किशोरवयीन मुली मासिक पाळी येईपर्यंत मासिक पाळीबद्दल अनभिज्ञ राहतात. त्यामुळे अनेकदा त्यांची तयारी झालेली नसते, त्यांना लाज वाटते आणि सामाजिक गैरसमजांमुळे त्यांच्यावर निर्बंध येतात.
‘उजास’मध्ये आम्ही खुल्या संवादांना चालना देण्यासाठी, मासिक पाळीशी संबंधित लज्जा आणि बंधनांचे चक्र तोडण्यासाठी आणि किशोरवयीन मुलींना आत्मविश्वासाने आणि स्वातंत्र्याने त्यांचे जीवन जगण्यास सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहोत. कोणत्याही मुलीची स्वप्ने कलंक किंवा चुकीच्या माहितीमुळे मागे पडू नयेत, यासाठी आम्ही अशा उपक्रमांच्या माध्यमातून एक पाऊल पुढे टाकतो.
मासिक पाळीच्या आरोग्याविषयी जागरूकता व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची खात्री व्हावी यासाठी सर्जनशील अभिव्यक्तीचा वापर करणारा वॉल पेंटिंगचा कार्यक्रम हा या मिशनचा एक नैसर्गिक विस्तार आहे. तरुणांना प्रवक्ते म्हणून समाविष्ट करून घेऊन या उपक्रमाने हे सुनिश्चित केले आहे, की ही भित्तिचित्रे मासिक पाळी नैसर्गिक आहे आणि कोणालाही शिक्षण किंवा संधीपासून कधीही मागे ठेवू नये याची कायमस्वरूपी आठवण करून देतील. अशा उपक्रमांच्या माध्यमातून प्रभावी संवादांना चालना देणे, मासिक पाळीचे सामान्यीकरण करणे आणि पुढील पिढीला मासिक पाळीच्या कलंकापासून मुक्त भविष्य घडविण्यासाठी सक्षम बनविणे उजास सुरू ठेवत आहे.