पुणे येथील‘खडकवासला जलाशय रक्षण’अभियान 23 व्या वर्षीही शतप्रतिशत यशस्वी !

निसर्गाचा ऱ्हास न होता त्याचे संरक्षण झाले पाहिजे ! – भीमराव अण्णा तापकीर, भाजप आमदार, खडकवासला मतदारसंघ

      पुणे – धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी आयोजित केले जाणारे खडकवासला जलाशय रक्षण अभियान सलग 23 व्या वर्षीही शतप्रतिशत यशस्वी झाले. हिंदु जनजागृती समिती, खडकवासला ग्रामस्थ आणि समविचारी संघटना यांच्या वतीने हे अभियान 14 मार्च या दिवशी राबवण्यात आले. या वेळी उपस्थित सर्वांनी खडकवासला जलाशयाभोवती मानवी साखळी करून जनतेचे प्रबोधन केले आणि धरणात उतरण्यास मज्जाव केला. धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रंग खेळून जलाशयात उतरणे, हिंदु सणांच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबविणे, तसेच हिंदूंना धर्मशास्त्र माहिती व्हावे यासाठी हिंदु जनजागृती समिती प्रारंभीपासून प्रबोधन करत आहे. भगवान श्रीकृष्णाच्या प्रतीमा पूजनाने अभियानाला प्रारंभ झाला. या प्रसंगी खडकवासला मतदार संघाचे आमदार श्री. भीमराव (अण्णा) तापकीर यांनी नारळ वाढवून अभियानाचे उद्घाटन केले.

     या वेळी इतिहास अभ्यासक डॉ. नंदकिशोर मते, खडकवासला मतदारसंघाचे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष श्री. सारंग नवले, नागरीक सोशल फाउंडेशनचे ज्ञानेश देसाई, नांदेड सिटी चे मुख्य संचालक अधिवक्ता नरसिंह लगड, यासह नांदेड विभागाचे श्री. प्रकाश गोरे, अधिवक्ता प्रदीप देशमुख, छावा चित्रपटाचे पटकथा लेखक श्री उन्मन बाणकर, हिंदुराष्ट्र समन्वय समितीचे श्री. सचिन घुले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांसह अन्य मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. धरणाच्या पाण्यात कोणी उतरू नये, तसेच पाण्याचे प्रदूषण करू नये यासाठी समिती निस्वार्थपणे हे कार्य करत आहे. सर्व नागरिकांनी जलस्रोत सुरक्षित राहतील यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन खडकवासला मतदारसंघाचे भाजप आमदार भीमराव अण्णा तापकीर यांनी केले.

      हिंदु जनजागृती समिती, खडकवासला ग्रामस्थ, पोलीस, प्रशासन, पाटबंधारे विभाग आणि समविचारी संघटना यांच्या वतीने हे अभियान राबवण्यात आले. या वेळी 200हून अधिक कार्यकर्ते, जिज्ञासू, धर्मप्रेमी उपस्थित होते. या अभियानासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि हिवरे, सासवड, नसरापूर, शिरवळ, भोर, नवलेवाडी, दौंड, पारगाव, भोसरी, मोशी, तसेच पिंपरी चिंचवड येथून आलेले धर्मप्रेमी सहभागी झाले होते. प्रबोधनानंतर अनेक नागरिकांनी अभियानाचे विशेष कौतुक केले. पोलीस-प्रशासनाचेही या अभियानाला उत्तम सहकार्य लाभले. धूलिवंदनाच्या दिवशी रंग खेळून नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. अशाच प्रकारे रंगपंचमीच्या दिवशी म्हणजे 19 मार्चलाही हे अभियान राबवण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.