लोकसंस्कृती, दुर्मिळ लोककला, लोककथा अनुभवण्याची पुणेकरांना सुवर्णसंधी

लोकसाहित्य व लोकसंस्कृती महोत्सवाचे आयोजन

येत्या २१ व २२ जानेवारी रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आयोजित आणि भारतीय लोककला अभ्यास संशोधन कल्याण केंद्र, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने व फोकलोर अॅन्ड क्लचरल हेरीटेज फाउंडेशन पुणे यांच्या समन्वयातून व्याख्यान, परिसंवाद, कार्यशाळा, शोधनिबंध वाचन, लोकसंस्कृती विषयक सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण येत्या २१ आणि दि. २२ जानेवारी रोजी नामदेव सभागृह, सावित्रीबाई फुले विद्यापीठ येथे सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत असे दोन दिवस कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे.

पहिला दिवशी मंगळवारी २१ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. नाव नोंदणी तसेच महोत्सवाची सांस्कृतिक दिंडी काढण्यात येणार आहे.  पहिल्या सत्रात सकाळी १० वा. महाराष्ट्र राज्याचे माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते या लोकसाहित्य व लोकसंस्कृती महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

या प्रसंगी महोत्सवाचे अध्यक्ष पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे व लोकसाहित्य अभ्यासक डॉ. अरुणा ढेरे हे असणार आहेत. तसेच या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, शासनाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

सदरील महोत्सवाचे संयोजक मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे आणि फोकलोर ॲन्ड क्लचरल हेरीटेज फाउंडेशन पुणे समन्वयक डॉ.सुनीता धर्मराव असणार आहेत. सदरील महोत्सव सर्वांसाठी खुला असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शासनाच्या वतीने समन्वयक डॉ.सुनीता धर्मराव यांनी केले आहे.

मंगळवारी लोकसंस्कृतीतील मौखिक परंपरा, परिसंवाद लोकसंस्कृतीची बलस्थाने आणि मर्यादा, परिसंवाद लोकसंस्कृतीतील स्त्री जीवन, शोधनिबंध वाचन, लोकसंस्कृती विषयक कार्यशाळा, अंबाजोगाईची लळीत परंपरा, लोकसंस्कृती विषयक सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण यात आदिवासी बोहाडा, पिंगळा गायन, लोकसंगीत होणार आहे.

बुधवारी लोक दैवत संप्रदाय आणि भक्ती संप्रदाय – एक अनुबंध, लोकरंगभूमीच्या भौतिक संस्कृतीमधील तथ्य आणि मिथक, लोक संस्कृतीतील रंजानात्म्क अविष्कार, लोकसंस्कृती विषयक कार्यशाळा – कळसूत्री बाहुल्या,  लोकसंस्कृती विषयक सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण – गोंधळ जागरण,  लोकजीवनातून लुप्त झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण म्हणी, वाक्यप्रचार, उखाणे, कोंडी यांचे लोककथेच्या माध्यमातून सादरीकरण, कथक आणि लावणी जुगलबंदी होणार आहे.