सनातन धर्मशिक्षण प्रदर्शनातून अध्यात्मप्रसार करणे हे महत्त्वपूर्ण आणि मोठे धर्म कार्य ! – महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज
प्रयागराज – सनातन धर्मातील छोट्या छोट्या गोष्टी आचरणात आणण्याच्या दृष्टीने सनातन धर्मशिक्षण प्रदर्शनी उपयोगी आहे. सनातन संस्थेद्वारा आयोजित ‘सनातन धर्मशिक्षण प्रदर्शनाच्या माध्यमातून होणारा अध्यात्मप्रसार हे महत्त्वपूर्ण आणि मोठे धर्म कार्य आहे. या कार्यास माझे नेहमी आशीर्वाद आहेत. ६ वर्षांपूर्वी उज्जैन येथील कुंभमेळ्यात सनातन संस्थेशी माझे नाते जोडले होते. तेव्हापासून माझा सनातन संस्थेशी वारंवार संपर्क येत असल्याने मी सनातन संस्थेचा सदस्य असल्यासारखे जोडलो आहे, असे भावस्पर्शी उद्गार इंदूर येथील महानिर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज यांनी काढले.
प्रयागराज येथील कुंभमेळ्यात भरवलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण प्रदर्शना’चे दीपप्रज्वलनद्वारे उद्घाटन केल्यानंतर ते मार्गदर्शन करतांना बोलत होते. स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज आदिवासी क्षेत्रामध्ये होणारे धर्मांतरण रोखणे आणि आदिवासी बालकांना गुरुकुलाद्वारे शिक्षण देण्याचे कार्य करतात. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, महाराष्ट्रातील यवतमाळ येथील भाजपचे माजी आमदार डॉ. संदीप धुर्वे उपस्थित होते. या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी प.पू. महाराजांना संपूर्ण प्रदर्शनी दाखवली.
प्रदर्शनात अध्यात्मविषयक ग्रंथप्रदर्शन !
सनातन धर्मशिक्षण प्रदर्शन कुंभमेळ्यातील सेक्टर १९ मध्ये मोरी आणि मुक्ती मार्गाच्या चौकात उभारण्यात आले आहे. १२ जानेवारीपासून १५ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत ही प्रदर्शनी सर्वांसाठी खुले असणार आहे. आध्यात्मिक, आयुर्वेदिक, तसेच धर्मशिक्षण देणारे ग्रंथ अन् फलक यांचे भव्य प्रदर्शन लावण्यात आले आहे. १३ भाषांमध्ये ३६६ हून अधिक संख्या असलेल्या या ग्रंथांमध्ये हिंदु जीवनपद्धती, संस्कृती, धर्म, अध्यात्म, राष्ट्र यांच्याशी संबंधित अमूल्य ज्ञान भाविकांना प्राप्त होणार आहे.
या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी आवाहन करतांना सांगितले की, कुंभमेळ्याला आलेल्या आणि येणार्या भाविकांनी धर्ममय दिनचर्या, सनातन धर्माचे सुलभ आचरण, धार्मिक कृत्यांचे शास्त्र, तसेच आनंदी जीवनासाठी अध्यात्म शिकण्यासाठी सनातन संस्था आयोजित सनातन धर्मशिक्षण प्रदर्शनीचा अवश्य लाभ घ्यावा.