आध्यात्मिकतेसह राष्ट्र-धर्माच्या रक्षणार्थ महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्या सनातन संस्थेची २५ वर्षांची वाटचाल
प्रस्तावना – सनातन संस्था, २२ मार्च १९९९ रोजी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झाली. आज, ही संस्था आपल्या रौप्य महोत्सवी वर्षात प्रवेश करत आहे. संस्थेने आध्यात्मिकतेसह राष्ट्र-धर्माच्या रक्षणार्थ महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. मानवजन्माचे सार्थक करण्यासाठी साधना शिकवणे आणि समाज जागृती करणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. आज सनातन संस्थेच्या कार्यामुळे अनेक साधक, वाचक आणि हितचिंतक आध्यात्मिक उन्नती साधत आहेत, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आले आहेत अशा सनातन संस्थेची संक्षिप्त वाटचाल….
विश्वकल्याणाचा ध्यास – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ ! वर्ष १९७१ ते १९७८ या कालावधीत त्यांनी इंग्लंडमध्ये ‘क्लिनिकल हिप्नोथेरपी’ (वैद्यकीय संमोहन-उपचार) या विषयावर विस्तृत संशोधन केले. ‘वैद्यकीय शास्त्रापेक्षा अध्यात्मशास्त्र हेच प्रगत शास्त्र आहे’, हे लक्षात आल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वैद्यकीय व्यवसाय बंद करून संतांच्या मार्गदर्शनाखाली साधना केली. त्या काळात त्यांनी अध्यात्मातील अधिकारी संतांकडून अध्यात्म आणि धर्म यांचा अभ्यास केला. स्वतः प्रत्यक्ष साधना केली. पुढे त्यांना इंदूरनिवासी थोर संत प.पू. भक्तराज महाराज गुरु म्हणून लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेही अध्यात्मातील अधिकारी संत झाले. सनातन हिंदु धर्मातील हे अध्यात्म ‘शास्त्र’ स्वरूपात म्हणजे ‘सायन्स’ म्हणून स्थापित व्हावे, यासाठी त्यांनी त्यांचे जीवन समर्पित केले. अध्यात्माचा वैज्ञानिक परिभाषेत प्रसार करतांनाच त्यांनी साधकांना ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ शिकवली.
हिंदू धर्माची महानता – सनातन संस्थेने हिंदु धर्माच्या महानतेचा प्रसार करण्यात प्रमुख भर दिला आहे. या कार्यामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागला; तथापि, चांगल्या कार्याला विरोध होतोच, हे सत्य स्वीकारून संस्था दृढ संकल्पाने अविरत मानवाच्या उद्धारासाठी कार्यरत आहे. डॉ. आठवले यांच्या विचारधारेतून प्रेरित होऊन अनेक व्यक्तींनी त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल केले आहेत. आज या संस्थेच्या कार्यामुळे हजारो साधक आध्यात्मिक उन्नती साधत आहेत.
आध्यात्मिक क्षेत्रातील क्रांती – कर्मयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग या तिन्ही योगांचा संगम असलेल्या ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी निर्मिती केली. सनातनचे सर्व साधक गुरुकृपायोगानुसार साधना करतात. गुरुकृपायोगानुसार साधना करून ऑक्टोबर २०२४ पर्यंत १२२ साधक संतपदी आरूढ झाले आहेत, तर १ हजारांहून अधिक साधक संतत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. ही एक आध्याित्मक क्षेत्रातील क्रांतीच आहे.
अध्यात्म वैज्ञानिक भाषेत उलगडून सांगणारी संस्था – एक दिवस ईश्वरी कृपेने भारताचे महान वैज्ञानिक व परम संगणकचे निर्माते डॉ. विजय भटकर यांच्याशी भेट झाली. त्याना संस्थेला भेट देण्यासंबंधी विनंती करण्यात आली. त्या वेळी म्हणाले मी तर वैज्ञानिक तर तुमच्या संस्थेमध्ये येवून काय करू ? त्या वेळी आम्ही अध्यात्म वैज्ञानिक भाषेत उलगडून सांगतो, असे त्यांना सांगितले. हे एकताच ते लगेच म्हणाले, अजूनपर्यंत मी कुठेही अध्यात्म हे वैज्ञानिक परिभाषेत समजावून सांगता येते हे ऐकले नव्हते. मला नक्कीच ते वैज्ञानिक परिभाषेत जाणून घ्यायचे आहे असे म्हणून त्यानी आश्रमाला भेट दिली व संपूर्ण समाधान व्यक्त केले. त्यांची भेट पूर्ण झाल्यानंतर सनातन संस्थेचे कार्य वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा किती महत्वपूर्ण आहे हे एका जगप्रसिद्ध वैज्ञानिकाकडून अधोरेखित झाले.
स्वभावदोष-निर्मूलन आणि अहं निर्मूलन प्रक्रिया ! – ‘षडरिपूंवर नियंत्रण’ आणि ‘चित्तशुद्धी’ यांविषयी अनेक धर्मग्रंथांमध्ये विवेचन आहे. या दोन्ही गोष्टी साध्य करणारी प्रक्रिया म्हणजे ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया आणि अहं-निर्मूलन प्रक्रिया’ ! साधना चांगली होण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ही प्रक्रिया साधकांना शिकवली. यामुळे होणारे लाभ आज सनातनचे हजारो साधक अनुभवत आहेत.
सनातन संस्थच्या ‘साधना सत्संगां’त स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया निःशुल्क शिकवते. या प्रक्रियेमुळे जीवनातील ताण-तणाव दूर होतात. ताण दूर झाल्याने मन आनंदी होते, जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होतो, आत्मविश्वास वृद्धींगत होतो, असे अनेक लाभ साधक अनुभवत आहेत. परिणामी साधकांचा व्यक्तीमत्त्व विकासही होतो.
सनातनचे आश्रम ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी समष्टी साधना म्हणून हिंदु धर्माचे पूर्णवेळ कार्य करण्याची इच्छा असलेल्या साधकांसाठी सनातन आश्रमांची निर्मिती केली आहे. आज राजकारण्यांनी समाजाला जातीजातींत विभाजित केले आहे. या पार्श्वभूमीवर सनातनच्या आश्रमांतील जातीनिरपेक्षता ठळकपणे दिसणारी आहे. आज सनातनचे आश्रम म्हणजे ईश्वरी राज्याची छोटीशी प्रतिकृतीच आहे. गोवा येथील सनातन आश्रम, हे सनातन संस्थेचे मुख्यालय आहे. या सनातन आश्रमात पुरी पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री स्वामी निश्चलानंद सरस्वती, तसेच कांची कामकोटी पिठाधीश्वर श्री स्वामी जयेंद्र सरस्वती यांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहेत. देशविदेशांतील अनेक संत, महंत, आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी, संशोधक, हिंदु धर्मासाठी विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत धर्मनिष्ठ, हिंदुत्वनिष्ठ आदी सनातन आश्रमाला भेट देण्यास नित्य येत असतात.
मानव कल्याणासाठी संस्थेची ग्रंथसंपदा – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अनेक वर्षांची तपस्या म्हणजे अमूल्य अशी ‘सनातनची ग्रंथसंपदा’ होय. या ग्रंथांचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रंथांमध्ये आधुनिक वैज्ञानिक परिभाषेत सनातन धर्मातील अध्यात्माची शिकवण दिली आहे. एप्रिल २०२४ पर्यंत १३ भारतीय भाषांमध्ये विविध आध्यात्मिक विषयांवरील तब्बल ३६५ ग्रंथांच्या ९६ लाख ५४ सहस्र प्रती प्रकाशित करण्यात आल्या आहेत. अजूनही ५ सहस्र ग्रंथ प्रकाशित होतील, एवढे लिखाण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संग्रहित करून ठेवले आहे. पुढील अनेक पिढ्यांना अध्यात्मातील विविध विषयांवरील ज्ञान मिळावे, या उदात्त हेतूने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अंथरूणावर खिळून असतांनाही ग्रंथलिखाणाचे कार्य अविरतपणे करत आहेत.
अद्वितीय योगदानाबद्दल पुरस्कार – सनातनच्या या दैवी कार्याची दखल देशविदेशातही घेतली जात आहे. सनातन संस्थेने भारतीय संस्कृती आणि परंपरा यांच्या जागतिक प्रसारासाठी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना फ्रान्सच्या सीनेटमध्ये (संसदेमध्ये) ‘भारत गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. यातून सनातन संस्थेच्या कार्याची दखल घेतल्यामुळे डॉ. जयंत आठवले यांना ‘भारत गौरव पुरस्कार’ मिळाला आहे, जो त्यांच्या कार्याचे आंतरराष्ट्रीय मान्यता दर्शवतो. हा पुरस्कार त्यांच्या आध्यात्मिक योगदानाबद्दल दिला गेला असून यामुळे सनातन संस्थेच्या कार्याची महत्त्वता आणखी वाढली आहे.
उल्लेखनीय कार्य ! – सनातन संस्थेने २५ वर्षांच्या या प्रवासात आध्यात्मिकतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था आज एक प्रमुख आध्यात्मिक प्रसार करणारी प्रमुख संस्था बनली आहे, जी समाजाच्या कल्याणासाठी सतत प्रयत्नशील आहे. भगवंताने आम्हाला या महान कार्याशी जोडले; याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो!
आध्यात्मिकतेच्या या प्रवासात पुढील अनेक पिढ्या सक्रिय सामील होतील आणि सनातन संस्थेचे कार्य आणखी विस्तारित होईल, अशी आम्हाला खात्री आहे! या सर्व उपक्रमामुळे आजच्या युगातील व्यक्तींना अधिक संतुलित आणि समाधानी जीवन जगण्याची संधी मिळेल, ज्यामुळे समाजातील एकता आणि समृद्धी आणखी वाढेल.
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था