वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनातील एक अग्रगण्य संस्था, पिंपरी येथील डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्राने क्षयरोगानंतरच्या फुफ्फुसाच्या आजारावर संशोधन करण्यासाठी अमेरिकेतील प्रसिद्ध बोस्टन विद्यापीठ आणि जॉन हॉपकिन्स विद्यापीठ यांच्याशी भागीदारी केली आहे. या दोन विद्यापीठांच्या सहकार्याने फेनोटाइप, प्रोग्रेशन आणि इम्यून कॉरिलेट्स ऑफ पोस्ट ट्युबरक्युलोसिस लंग डिसीज (पोस्ट टीबी लंग डिसीजेस-पीटीएलडी) या विषयावर संशोधन करण्यात येणार आहे.
डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयासाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, बेथेस्डा ही संस्था या संशोधनासाठी अर्थसहाय्य देणार असून, क्षयरोगानंतरच्या फुफ्फुसाच्या आजारांची लक्षणे, प्रगती आणि रोगप्रतिकारकातील सहसंबंध यावर सखोल अभ्यास करून या आजारांचे मूल्यमापन करून ज्ञानात भर घालणे हे या संशोधनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
हे संशोधन पिंपरीच्या डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अत्याधुनिक संशोधन केंद्रात होणार असून, बोस्टन युनिव्हर्सिटी आणि जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीसोबतच्या सहकार्यातून करण्यात येणारे हे संशोधन दोन वर्षात महत्त्वपूर्ण निकाल देईल, अशी अपेक्षा आहे.
गेल्या दशकभरात डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्राने जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने क्षयरोग, मधुमेह आणि प्रतिजैविकांना प्रतिकार अशा विविध महत्त्वाच्या संशोधनांमध्ये मोठे योगदान दिले आहे. आता बोस्टन विद्यापीठासह या नव्या संशोधनात सहभागी होऊन संस्था हा संशोधन सहकार्याचा वारसा पुढे नेत आहे.
क्षयरोग (टीबी) हा जगभरातील एक प्रमुख संसर्गजन्य आजार असून, या आजाराने २०२० मध्ये १५ लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून, एक कोटींहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. जगभरातील एकूण रुग्णांच्या संख्येच्या एक चतुर्थांश रुग्ण भारतात आढळतात. दर वर्षी देशात अंदाजे २७ लाख जणांना याची लागण होते, तर दरवर्षी चार लाखांहून अधिक क्षयरुग्णांचा मृत्यू होतो. क्षयरोगावर यशस्वी उपचार होऊनही ५० ते ७५ टक्के रुग्णांमध्ये फुफ्फुसाच्या कार्यातील दोष निर्माण होतात आणि त्यांना धूम्रपान करण्यामुळे होणाऱ्या क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजचा (सीओपीडी) धोका तीनपट अधिक असतो.
क्षयरोगानंतर होणारे फुफ्फुसाचे आजार क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजपेक्षा (सीओपीडी) फिनोटिपीकली वेगळे असू शकतात. या पीटीएलडी आजारांची नैसर्गिक लक्षणे ओळखण्यासाठी आणि फुफ्फुसाच्या आजारांची लक्षणे ओळखण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण अभ्यास आवश्यक आहे. त्यादृष्टीने करण्यात येणाऱ्या या संशोधनाचा मुख्य उद्देश फुफ्फुसांवरील दीर्घकालीन परिणाम ओळखणे व त्यांचे विश्लेषण करणे आणि प्रगत निदान पद्धती तसेच उपचारांबाबत मार्गदर्शन करणे हे आहे, ज्यामुळे क्षयरोगानंतर होणाऱ्या फुफ्फुसांच्या आजारांना वेळीच प्रतिबंध करणे शक्य होईल. त्यादृष्टीने क्षयरोगातून बऱ्या झालेल्या रूग्णांचे जीवन सुधारण्यासाठी नावीन्यपूर्ण उपचार पद्धती आणि पुनर्वसन धोरणांवर काम करण्यासाठी हे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या सहकार्याबाबत डॉ. यशराज पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे विश्वस्त आणि खजिनदार म्हणाले, “बोस्टन विद्यापीठासोबतची ही भागीदारी अत्याधुनिक संशोधनाद्वारे जागतिक आरोग्य क्षेत्रात प्रगती करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करते. या अभ्यासामुळे क्षयरोगानंतरच्या फुफ्फुसांच्या आजारांवर उपचार आणि व्यवस्थापन करण्यासाठी नवे मार्ग उपलब्ध होतील, असा आम्हाला विश्वास आहे. भारतातील आणि जगभरातील रूग्णांना याचा फायदा होईल. दोन्ही संस्थांचा शैक्षणिक उत्कृष्टता आणि संशोधन क्षेत्रातील समृद्ध वारसा असून, जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वपूर्ण प्रगतीसाठी एक मोलाची संधी उपलब्ध झाली आहे. जगभरातील लोकांना उपयुक्त ठरेल अशा आणखी नवनव्या संशोधन उपक्रमांद्वारे आमची भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. ”
श्वसन विकार विभागाचे प्रमुख डॉ. एम.एस. बरथवाल म्हणाले, “क्षयरोग, हे जागतिक आरोग्यक्षेत्रातील एक प्रमुख आव्हान आहे. जगभरातील लाखो लोकांच्या आयुष्यावर याचा परिणाम होतो. क्षयरोगानंतरच्या फुफ्फुसांच्या आजारांवर संशोधन झाले असले, तरी त्याबाबत आपल्याकडे कमी माहिती उपलब्ध आहे. आमच्या संस्थेचे बोस्टन युनिव्हर्सिटी सोबतचे सहकार्य या आजारांचे क्लिनिकल, पॅथॉलॉजिकल आणि सामाजिक-आर्थिक परिणामांची व्याप्ती लक्षात घेणारा सर्वसमावेशक अभ्यास करून हे अंतर भरून काढण्याचा प्रयत्न करेल. ”
या वेळी, राज्य क्षयरोग विभागाचे प्रतिनिधी डॉ. राजाभाऊ येवले म्हणाले, “क्षयरोगाचेआरोग्यावर होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांबाबत सखोल ज्ञान मिळवणे हे या आजाराविरुद्धच्या लढ्यातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यादृष्टीने डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र पिंपरी, पुणे आणि बोस्टन विद्यापीठ आणि जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी यांच्यातील सहकार्य हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या भागीदारीमुळे केवळ सार्वजनिक आरोग्यात सुधारणा होईल, असे नाही तर काही महत्त्वाच्या शोधांचा मार्ग मोकळा होईल ज्यामुळे संपूर्ण देशातील क्षयरुग्णांना निश्चितपणे मदत होईल. आम्हाला खात्री आहे की हे संशोधन अत्यंत मोलाची भर घालेल आणि क्षयरोगाने बाधित रूग्णांच्या जीवनाची गुणवत्ता वाढवण्यास हातभार लावेल.”
बोस्टन विद्यापीठाचे प्रमुख संशोधक डॉ. अक्षय गुप्ते म्हणाले, “ भारतातील आघाडीच्या संशोधन संस्थांपैकी एका संस्थेशी भागीदारी केल्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत. क्षयरोगानंतरच्या फुफ्फुसाच्या आजारांवरील हे संशोधन केवळ वैज्ञानिक ज्ञान मिळवण्यासाठी नाही, तर या आजाराचे दीर्घकालीन परिणाम भोगणाऱ्या व्यक्तींचे जीवन सुधारण्यासाठी आहे. या संशोधनातील निष्कर्ष आम्हाला त्यांचे जीवन अधिक चांगल्या प्रकारे बदलण्यास मदत करतील.”
या बैठकीला डॉ. विद्या मावे (संचालक, जॉन्स हॉपकिन्स इंडिया), डॉ. निशी सूर्यवंशी (उपसंचालक, जॉन्स हॉपकिन्स इंडिया) आणि डॉ. डी वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर, डॉ. अर्जुन काकराणी (संचालक, शैक्षणिक सहयोग), डॉ. एम. एस. बरथवाल (प्राध्यापक आणि श्वसन विकार विभागप्रमुख), डॉ. पराग रत्नाकर (संचालक –मध्यवर्ती नैदानिक प्रयोगशाळा), डॉ. संजय खलाडकर (विभागप्रमुख, रेडिओलॉजी) आणि डॉ.शहजाद बेग मिर्झा (सहयोगी प्राध्यापक, मायक्रोबायालॉजी विभाग) उपस्थित होते.