अग्नीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला, ‘दीपान्वित अमावास्ये’ला केले जाणारे दीपपूजन !
दीपपूजन करण्यामागील शास्त्र – ‘दिव्याची ज्योत ही अग्नितत्त्वाचे प्रतीक आहे. अग्नीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला ‘दीपपूजन’ केले जाते.
पंचतत्त्वांपैकी अग्नितत्त्वाचे अनन्यसाधारण महत्त्व – ‘पृथ्वीवरील सर्व सजीव-निर्जीव पदार्थ हे पृथ्वी, जल, अग्नी, वायु आणि आकाश या पंचतत्त्वांमुळे निर्माण झाले आहेत. पंचतत्त्वांपैकी अग्नितत्त्वाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अग्नीचा गुण ‘रूप’ असून अग्नीमुळे आपण समोरची वस्तू (रूप) पाहू शकतो. ‘नेत्र’ हे ज्ञानेंद्रिय अग्नितत्त्वाशी संबंधित आहे. अग्नि आपल्या प्रकाशाने अंधःकाराचा नाश करून सत्याचे ज्ञान करून देतो. प्राणीमात्राच्या उदरात अग्नि ‘वैश्वानर’ या रूपाने वास करून अन्नपचन करतो. ग्रहमालेचा अधिपती सूर्य हा अग्नीचे रूप असून तो अखिल विश्वाचेे भरण-पोषण करतो.वैदिक काळात अग्निदेवतेचे स्थान सर्वोच्च होते. ऋग्वेदात अग्नीला ‘होता’ असे विशेषण आहे. ‘होता’ म्हणजे देव किंवा शक्ती यांचे आवाहन करणारे माध्यम ! यज्ञात संबंधित देवतांना आवाहन केल्यावर अग्नि यज्ञातील हविर्भाग त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. त्यामुळे अग्नीला देव आणि मानव यांना जोडणारा दुवा मानले गेले आहे.’ (संदर्भ : भारतीय संस्कृतिकोश, खंड पहिला, पृ. ७८)
दीपान्वित अमावास्या – ‘आषाढ अमावास्येला ‘दीपान्वित अमावास्या’ असेही म्हणतात. या दिवशी दिव्यांचे पूजन केले जाते. सुवासिनी स्त्रिया घरातील दिवे स्वच्छ आणि एकत्रित करून त्यांच्याभोवती रांगोळी काढतात. ते दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा करतात. पूजेत पक्वान्नांचा नैवेद्य दाखवतात आणि पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात.
दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजसां तेज उत्तमम् । गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव ॥
मंत्राचा अर्थ : हे दीपा, तू सूर्यरूप आणि अग्नीरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.यानंतर दिव्याची कहाणी ऐकतात. हे पूजन केल्याने ‘आयुरारोग्य आणि लक्ष्मी यांची प्राप्ती होते’, अशी फलश्रुती आहे.’ (संदर्भ : भक्तिकोश, चतुर्थ खंड, पृ. ८७७)
दीपपूजन केल्यामुळे होणारे आध्यात्मिक स्तरावरील लाभ
अ. आषाढी अमावास्येला दीपपूजन केल्यामुळे दिव्याला तेजतत्त्वयुक्त सात्त्विकता आणि चैतन्य मिळून वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून त्याचे रक्षण होते. – चातुर्मासात देव झोपले असल्याने (क्रियाविरहित झाल्याने) वायूमंडलात रज-तम लहरींचे प्रमाण आणि वाईट शक्तींचे प्राबल्य वाढलेले असते. तसेच पावसाळी आणि ढगाळ वातावरणामुळे पृथ्वीवर सूर्यप्रकाशाचे प्रमाण अल्प प्रमाणात मिळते. अशा प्रकारे चातुर्मासात सात्त्विकता, चैतन्य आणि तेजतत्त्व यांचा अभाव जाणवतो. इतर तिथींच्या तुलनेत पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना वाईट शक्तींचे बळ वाढून त्या विविध सात्त्विक घटकांवर सूक्ष्मातून अधिक प्रमाणात आक्रमणे करतात. चातुर्मासातील आषाढी अमावास्येलाही वाईट शक्तींचे आक्रमण मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे आषाढी अमावास्येला दीपपूजन करण्याचे विशेष महत्त्व आहे. या पूजनाने दिव्याला तेजतत्त्वयुक्त सात्त्विकता आणि चैतन्य मिळून त्याचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होते.
आ. वायूमंडलातील रज-तम लहरी आणि त्रासदायक शक्ती यांमुळे दिव्याभोवती आलेले सूक्ष्म आवरण दीपपूजनाने नष्ट होणे
दिव्याभोवतीच्या वायूमंडलात कार्यरत असणार्या रज-तम लहरींचे आणि त्रासदायक शक्तीचे दिव्याभोवती आलेलेे सूक्ष्म आवरण दीपपूजनाने नष्ट होते. त्यामुळे दिवा प्रज्वलित केल्यावर त्याच्या ज्योतीचा प्रकाश स्वच्छ, स्पष्ट आणि प्रखर दिसू लागतो. तसेच ज्योतही स्थिर रहाते आणि ती स्पष्ट दिसते. दिव्याच्या ज्योतीला काजळी लागण्याचे प्रमाणही न्यून होते.
इ. दिव्यातील देवतत्त्वाचे पूजन झाल्याने त्याच्यातील देवत्व जागृत होऊन ते वर्षभर कार्यरत रहाणे
दिव्यातील देवतत्त्वाचे पूजन झाल्याने त्यातील देवत्व जागृत होऊन ते वर्षभर कार्यरत रहाते. दिव्याला पाहून नमस्कारासाठी हात आपोआप जोडले जाणे, दिव्याला पाहून भाव जागृत होणे, दिव्याचा प्रकाश अधिक तेजस्वी आणि चैतन्यमय झाल्याचे जाणवणे, ही सर्व दिव्यातील देवत्व जागृत झाल्याची लक्षणे अन् अनुभूती आहेत.
ई. दिव्याभोवती अग्निनारायणाच्या तेजतत्त्वाचे अभेद्य संरक्षककवच निर्माण होऊन वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून त्याचे वर्षभर रक्षण होणे
दिव्याच्या पूजनाने त्याला अग्निनारायणाचे लक्षांश तेज ग्रहण होऊन ऊर्जा पुन्हा प्राप्त होते. या ऊर्जेच्या बळावर दिव्याची साधना (सात्त्विकता) अविरतपणे चालू रहाण्यास साहाय्य होते. अग्निनारायणाच्या तेजाच्या अंशाच्या प्राप्तीमुळे दिव्याभोवती तेजतत्त्वाचे अभेद्य संरक्षककवच निर्माण होऊन त्याचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून वर्षभर रक्षण होते.
उ. दिव्याच्या पूजनाने दिव्याची वाईट शक्तींशी सूक्ष्मातील युद्ध करण्याची क्षमता वाढणेे आणि ती वर्षभर टिकून रहाणे
दिव्याच्या पूजनाने त्याला प्राप्त झालेल्या तेजतत्त्वयुक्त अग्निनारायणाच्या संरक्षककवचामुळे दिव्याचे क्षात्रतेज वृद्धींगत होते. त्यामुळे दिव्यावर होणारी वाईट शक्तींची आक्रमणे परतवण्याची आणि वाईट शक्तींशी सूक्ष्म युद्ध करण्याची दिव्याची क्षमता वाढते अन् वर्षभर टिकून रहाते.
ऊ. दिव्याच्या पूजनामुळे भक्तरूपी दिवा अन् भगवंत यांचे पूजकाला कृपाशीर्वाद मिळणे
दिवा हा देवाचा सेवकभावातील भक्त आहे. भक्ताचे पूजन केल्याने भक्ताला आनंद होण्यासह भगवंतही प्रसन्न होतो आणि पूजकाला भक्तरूपी दिवा अन् भगवंत यांचे कृपाशीर्वाद मिळून त्यांची साधना चांगली होते.
ए. दीपपूजनाने पूजकाची समष्टी साधना होणे
दीपपूजन केल्याने दिव्याच्या साधनेला साहाय्य होत असल्याने दीपपूजनाने पूजकाची समष्टी साधना होते आणि त्याला समष्टी साधनेचे फळ प्राप्त होते.
दीपपूजन आणि दीपयज्ञ
दीपपूजन करणे, हे व्यष्टी साधनेच्या अंतर्गत येते. अशा अनेक दिव्यांचे पूजन करणे, ही समष्टी साधनेच्या स्तरावरील कृती असल्याने तिला दीपयज्ञ म्हणतात. आषाढ मासात (महिन्यात) दीपयज्ञ करण्याचीही प्रथा आहे.
‘दीप अमावास्ये’चे वैज्ञानिक कारण आणि त्याचे महत्त्व
हिंदूंच्या सर्वाधिक कुचेष्टा आणि विकृत विनोद यांचे जे सण आहेत, त्यात वटपौर्णिमेनंतर ‘दीप अमावास्या’ हा सण येतो. व्यक्तीगत पातळीवर ही अमावास्या साजरी करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे; पण ‘दीपपूजेच्या ऐवजी केवळ गटारी म्हणून याला सर्वत्र कुप्रसिद्धी मिळू नये’, असे वाटते. आपण आपला धर्म, आपली संस्कृती, आपला सण यांचे का म्हणून विडंबन करायचे ? उलट महाराष्ट्रातील सर्व जातींच्या लाखो घरांमध्ये मोठ्या भक्तीभावाने या दिवशी दीपपूजन केले जाते. त्यामुळे आपण आपल्या सणांचे विडंबन टाळायला हवे.
संकलक – प्रा. विठ्ठल जाधव
सौजन्य – सनातन संस्था , संपर्क – ७०३८७१३८८३