गुरुपौर्णिमा विशेष लेख मालिका – भाग ३

गुरूंचे प्रकार

कार्यपद्धतीनुसार प्रकार : ‘वैद्य तीन प्रकारचे असतात – उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. जो वैद्य नाडी पाहून ‘औषध घे’ असे फर्मावून निघून जातो आणि रोगी औषध घेतो किंवा नाही याची काही विचारपूस करत नाही, तो कनिष्ठ वैद्य. जो वैद्य रोगी औषध घेत नाही हे पाहून ‘औषध घेतल्यास तू बरा होशील’, असे नानाप्रकारे गोड गोड बोलून त्याला समजावतो, तो झाला मध्यम वैद्य आणि जो वैद्य रोगी काही केल्या औषध घेतच नाही असे पाहून, त्याच्या छातीवर गुडघा रोवून त्याला जबरदस्तीने औषध घ्यायला लावतो, त्याला म्हणावे उत्तम वैद्य. त्याचप्रमाणे जे गुरु वा आचार्य उपदेश दिल्यानंतर शिष्यांची काही विचारपूस करत नाहीत ते आचार्य किंवा गुरु कनिष्ठ होत. शिष्यांना उपदेश ग्रहण करता यावा, त्यांचे कल्याण व्हावे, म्हणून पुनःपुन्हा त्यांना समजावून सांगतात अन् त्यांच्यावर प्रेम करतात ते मध्यम गुरु; परंतु शिष्य नीट अवधान देत नाहीत किंवा अनुरूप आचरण करत नाहीत हे पाहून जे आचार्य प्रसंगी जोरजबरदस्तीने का होईना, त्यांना तसे करायला लावतात, तेच उत्तम आचार्य होत.’ अर्थात् ही जोरजबरदस्ती स्थूल माध्यमातून नव्हे, तर सूक्ष्मातून केली जाते; म्हणून सर्वसाधारण व्यक्तीच्या लक्षात येत नाही.

अंतर्गुरु आणि बाह्यगुरु : ‘अंतर्गुरु आणि बाह्यगुरु यांच्यात फारसा भेद नसतो. तुम्ही बाह्यगुरूची करत असलेली पूजा वास्तविक तुमच्या हृदयस्थ गुरूलाच पोहचत असते. परमात्म्याला तुम्ही आपले हृदय अर्पण करता; त्याच्यासाठी म्हणून तुम्ही जे काही करता, त्यापासून तुमच्या अंतर्यामी तुमचाच लाभ होतो. सहस्रदल-मंडलातील त्रिकोणात अंतर्गुरूचा वास असतो, असे गुरुगीतेतही सांगितले आहे –

   ‘‘अकठादित्रिरेखाब्जे-सहस्रदल मण्डले । हंसपाश्र्वत्रिकोणे च स्मरेत्तन्मध्यगं गुरुम् ।। ५८ ।।’’

   हा अंतर्गुरु सहस्रसूर्यासमान तेजःपुंज असतो; भेद इतकाच की, बाह्य सूर्यप्रकाशामुळे उष्णता निर्माण होते; पण अंतर्गुरूचा प्रकाश शीतल असतो. ध्यानाच्या उच्च अवस्था प्राप्त करून घेणार्‍या प्रत्येकाला अंतर्गुरूचे दर्शन होते. सहस्रदलातील दिव्य प्रकाशात सतत चमचमणार्‍या नीलबिंदूच्या रूपाने गुरु वास करत असतात. तुम्हाला तुमच्या अंतर्यामी वास करणार्‍या गुरूकडून सत्य काय आहे, ते समजले म्हणजे ज्याचे तुम्ही आजवर पूजन करत आलात तो बाह्यगुरु अंतर्गुरूहून भिन्न नसल्याची प्रचीति तुम्हाला येईल.’

   एकदा तुमची अंतर्शक्ति जागृत झाली की, मग ती स्वतःच गुरुकृपा बनून तुम्हांला मार्गदर्शन करू लागते. अगदी पूर्णत्व प्राप्त होईपर्यंत ती अंतर्शक्तिच तुम्हांला मार्गदर्शन करत राहते. ‘आपण पूर्ण आहोत आणि यापूर्वीही सतत पूर्णच होतो’, याची जाणीव तुम्हांला शेवटी होते.

 गुरूंचे महत्त्व

   या जन्मातील अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठीही प्रत्येक जण शिक्षक, डॉक्टर वकील वगैरे दुसर्‍या कोणाचे तरी मार्गदर्शन घेतो. मग जन्ममृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्ति देणार्‍या गुरूंचे महत्त्व किती असेल, याची कल्पनाही करता येत नाही. पुढील सूत्रांंवरून ते महत्त्व स्पष्ट होईल.

मानसशास्त्रदृष्ट्या

१. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव आणि सामथ्र्याची चुणूक न दाखवणार्‍या देवांपेक्षा, शिष्याच्या उन्नतीसाठी या गोष्टी दाखवणार्‍या गुरूंकडे शिष्याचे लक्ष जास्त प्रमाणात वेंâद्रित होऊ शकते.

२. गुरूंना अंतज्र्ञानाने सर्वकाही समजते, या अनुभूतीमुळे शिष्य वाईट कृत्ये करणे बर्‍याचदा टाळतो.

३. ‘शिष्याला शिकवण्याऐवजी बाबा असे काय बोलतात ?’, असे काही अभ्यासू साधकांना वाटते. त्याविषयी विचारले असता बाबा म्हणाले, ‘‘मला भजी किंवा थालीपीठ आवडते असे म्हणतो, त्यामुळे एखादा शिष्य घरी भजी किंवा थालीपीठ करतो तेव्हा त्या वेळी तरी त्याला माझी आणि नाम घ्यायची आठवण होते.’’

४. स्वतःच्या ‘गुरु’पणामुळे शिष्याला त्याच्या लघुपणाचा न्यूनगंड वाटू न देता, गुरु त्याचा न्यूनगंड काढून त्याला ‘गुरु’पद प्राप्त करून देतात.

अध्यात्मशास्त्रदृष्ट्या

१. गुरूंकडे जाणे : गुरु शिष्याला आपली आठवण करून देतात; मगच शिष्य गुरूंकडे जाऊ शकतो.

२. संकटांचे निवारण : ‘काही भक्त मानवी स्वभावाला अनुसरून, प्रापंचिक दुःखे भगवंतांने दूर करावीत, या इच्छेने भगवंतांकडे जात. आईबाप जसे आपल्याला संकटात सांभाळतात, तसे भगवंत आपल्याला संकटातून सोडवतील, अशी त्यांची समजूत. असे भक्त पत्र लिहीत किंवा मनात भगवंतांची प्रार्थना करत. त्याचा परिणाम असा होई की, संकट तर निघून जाई किंवा संकट अटळ असले तर भक्ताच्या मनात ते सहन करण्यासाठी शांति अगर सामथ्र्य उत्पन्न होत असे. भगवंतांने तशी इच्छा केल्यामुळे असे घडत नसे, तर आपोआपच; परंतु भक्ताची श्रद्धा आणि त्याच्या शरणागतीमुळे गुरुकृपेचा जो ओघ वहात असतो, त्या कृपेमुळे हे घडून येई.

३. प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढणे : मंद प्रारब्ध भोगण्याची क्षमता मध्यम साधनेने, मध्यम प्रारब्ध भोगण्याची क्षमता तीव्र साधनेने, तर तीव्र प्रारब्ध भोगण्याची क्षमता केवळ गुरुकृपेनेच प्राप्त होते.

 गुरुमहिमा

१. पिता हा पुत्राला केवळ जन्म देतो, तर गुरु त्याची जन्ममरणातून सुटका करतो; म्हणून पित्यापेक्षाही गुरूला श्रेष्ठ मानले आहे.

२. एक बद्ध जीव दुसर्‍या बद्ध जीवाचा उद्धार करू शकत नाही. गुरु मुक्त असल्यानेच शिष्यांचा उद्धार करू शकतात.

३.    सद्गुरुवांचूनी सांपडेना सोय । धरावे ते पाय आधी त्याचे ।।

   आपणासारिखें करिती तात्काळ । कांही काळवेळ न लगे त्यांसी ।।

   लोह परिसासी न साहे उपमा । सद्गुरु-महिमा अगाधचि ।।

   तुका म्हणे ऐसें आंधळे हें जन । गेलें विसरून खर्‍या देवा ।।– संत तुकाराम

४. भगवान् श्रीकृष्णांनीही सांगितले आहे की, देवभक्तीपेक्षा गुरुभक्तिच अधिक श्रेष्ठ.

मज माझ्या भक्तांची थोडी गोडी । परि गुरुभक्तांची अति आवडी ।। – श्री एकनाथी भागवत ११:१५२७

   म्हणजेच श्रीकृष्ण म्हणतात, ‘माझ्या भक्तांपेक्षा गुरुभक्तच मला अधिक आवडतो.’

   आणि विश्वामाजी ईश्वरु । एकचि व्यापक सद्गुरु । म्हणूनि सर्वाभूती आदरु । करीती ते ।।  संत एकनाथ

५. ‘मला जे पाहिजे होते ते सर्व एके ठिकाणी, श्री तुकामार्इंच्या ठिकाणी, मला मिळाले. मला निर्गुणाचा साक्षात्कार, सगुणाचे अलोट प्रेम आणि अखंड नाम एकत्र हवे होते. ते त्यांच्यापाशी मिळाले. – श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज’

६. श्री शंकराचार्यांनी म्हटले आहे, ‘ज्ञानदान करणार्‍या सद्गुरूंना शोभेल अशी उपमा या त्रिभुवनात कोठेही नाही. त्यांना परिसाची उपमा दिली तरी तीही अपुरी पडेल; कारण परीस लोखंडास सुवर्णत्व देत असला तरीही त्याचे परीसत्व देऊ शकत नाही.’ समर्थ रामदासस्वामींनीही दासबोधात (१.४.१६) म्हटले आहे –

   शिष्यास गुरुत्व प्राप्त होये । सुवर्णे सुवर्ण करिता न ये । म्हणोनी उपमा न साहे । सद्गुरूसी परिसाची ।।

७.    कल्पतरुची द्यावी उपमा । कल्पिलें लाभे त्याचा महिमा । न कल्पितां पुरवी कामा । कामधेनु श्रीगुरुचि ।।श्री गुरुचरित्र ३:३५

८. ‘गुरूंना उपमा देण्याजोगी या जगात दुसरी कोणतीही वस्तु नाही. गुरु सागरासारखे म्हणावे, तर सागराजवळ खारटपणा असतो; पण सद्गुरु सर्वप्रकारे गोड असतात. सागरास भरती-ओहोटी असते; पण सद्गुरूंचा आनंद अखंड असतो. सद्गुरु कल्पवृक्षाप्रमाणे म्हणावे, तर कल्पवृक्ष आपण जी कल्पना करावी ती पुरवितो; पण सद्गुरु शिष्याची कल्पना समूळ नाहीशी करून त्याला कल्पनातीत अशा वस्तूची प्राप्ति करून देतात; म्हणून गुरूंचे गुणवर्णन करण्यास ही वाणी असमर्थ आहे.’

संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘गुरुकृपायोग’

 संपर्क : ७०३८७१३८८३