गुरुपौर्णिमा लेख विशेष लेख मालिका – भाग २

गुरूंचे खरे स्वरूप

शिष्याचा विश्वास : ‘गुरु विश्वासावर आहे. आपल्या विश्वासावर गुरूंची महती अवलंबून आहे. गुरु तुमच्यापण विश्वासावर आहे. तुमच्या विश्वासातच गुरु आहे.

भावार्थ : ‘गुरु विश्वासावर आहे. आपल्या विश्वासावर गुरूंची महती अवलंबून आहे’, यातील गुरु हा शब्द बाह्यगुरूंविषयी वापरलेला आहे. गुरूंवर विश्वास असेल तरच गुरु हे ‘गुरु’ म्हणून कार्य करू शकतात. ‘गुरु तुमच्यापण विश्वासावर आहे. तुमच्या विश्वासातच गुरु आहे’, यातील गुरु हे अंतर्यामी असलेले गुरु होत.’

गुरुतत्त्व एकच : सर्व गुरु जरी बाह्यतः स्थूलदेहाने निराळे असले, तरी आतून मात्र ते एकच असतात. ज्याप्रमाणे गायीच्या कोणत्याही आचळातून सारखेच शुद्ध आणि निर्मळ दूध येते, त्याचप्रमाणे प्रत्येक गुरूंमधील गुरुतत्त्व एकच असल्याने त्यांच्याकडून येणार्‍या आनंदलहरी सारख्याच असतात. समुद्राच्या लाटा जशा किनार्‍याकडे येतात, तसेच ब्रह्म / ईश्वर यांच्या लाटा, म्हणजे गुरु, समाजाकडे येतात. सर्व लाटांतील पाण्याची चव जशी तीच असते, तसेच सर्व गुरूंतील तत्त्व एक म्हणजे ब्रह्मच असते. पाण्याच्या टाकीला लहान-मोठ्या बर्‍याच तोट्या असल्या, तरी प्रत्येक तोटीतून टाकीतीलच पाणी येते. विजेचे दिवे कितीही निरनिराळ्या आकाराचे असले, तरी वहाणार्‍या विजेमुळे निर्माण होणारा प्रकाशच त्यांतून बाहेर पडतो. तसेच गुरु बाह्यतः निरनिराळे दिसले तरी त्यांच्यातील गुरुतत्त्व, म्हणजेच ईश्वरीतत्त्व एकच असते.

   गुरु म्हणजे स्थूलदेह नव्हे. गुरूंना सूक्ष्मदेह (मन) व कारणदेह (बुद्धि) नसल्याने ते विश्वमन आणि विश्वबुद्धीशी एकरूप झालेले असतात; म्हणजेच सर्व गुरूंचे मन अन् बुद्धि हे विश्वमन आणि विश्वबुद्धि असल्याने ते एकच असतात.

ईश्वर आणि गुरु

ईश्वर आणि गुरु एकच आहेत : गुरु म्हणजे ईश्वराचे साकार रूप व ईश्वर म्हणजे गुरूंचे निराकार रूप.

१. अधिकोषाच्या बर्‍याच शाखा असतात. त्यांपैकी स्थानिक शाखेत खाते उघडून पैसे भरले तरी चालते. तसे करणे सोपेही असते. दूरच्या मुख्य कार्यालयातच जाऊन पैसे भरले पाहिजेत, असे नसते. तसे करण्याचा त्रास घेण्याचीही आवश्यकता नसते. तसेच भाव-भक्ति, सेवा, त्याग वगैरे न दिसणार्‍या ईश्वरासाठी करण्यापेक्षा त्याच्या सगुणरूपाच्या म्हणजे गुरूंच्या संदर्भात केल्यास ते सोपे जाते. स्थानिक शाखेत भरलेले पैसे जसे अधिकोषाच्या मुख्यालयातच जमा होतात, तसे गुरूंची सेवा केली की ती ईश्वरालाच पोहोचते.

२. वामनपंडितांनी भारतभर फिरून मोठमोठ्या विद्वानांचा पराभव केला आणि त्यांच्याकडून पराजयपत्रे लिहून घेतली. ती विजयपत्रे घेऊन जात असतांना एका संध्याकाळी ते एका झाडाखाली संध्या करायला बसले. तेव्हा त्यांना फांदीवर एक ब्रह्मराक्षस बसलेला दिसला. तेवढ्यात दुसरा एक ब्रह्मराक्षस बाजूच्या फांदीवर येऊन बसायला लागला, तेव्हा पहिला त्याला येऊ देईना आणि म्हणाला, ‘‘ही जागा वामनपंडितासाठी आहे; कारण त्याला आपल्या विजयाचा फार अहंकार झाला आहे.’’ हे ऐकताक्षणीच वामनपंडितांनी सर्व विजयपत्रे फाडली आणि ते हिमालयात तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. बरीच वर्षे तपश्चर्या केल्यावरही देव दर्शन देईना; म्हणून निराशेने त्यांनी कड्यावरून खाली उडी मारली. तेवढ्यात ईश्वराने त्यांना झेलले आणि डोक्यावर डावा हात ठेवून आशीर्वाद दिला. त्यानंतर पुढील संभाषण झाले.

पंडित  :डोक्यावर डावा हात का ठेवला, उजवा का नाही ?

ईश्वर  : तो अधिकार गुरूंचा आहे.

पंडित  : गुरु कोठे भेटतील ?

ईश्वर  : सज्जनगडावर.

   त्यानंतर वामनपंडित सज्जनगडावर समर्थ रामदासस्वामींच्या दर्शनाला गेले. समर्थांनी त्यांच्या पाठीवर उजवा हात ठेवून आशीर्वाद दिला.

पंडित  : डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद का नाही दिला ?

स्वामी : अरे, ईश्वराने हात ठेवलेला आहेच की!

पंडित  : मग ईश्वराने ‘डोक्यावर हात ठेवायचा अधिकार गुरूंचा’, असे का म्हटले ?

स्वामी : ईश्वराचा उजवा आणि डावा हातही एकच आहे, ईश्वर अन् गुरु एकच आहेत, हे कसे कळत नाही तुला!

संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘गुरुकृपायोग’

संपर्क : ७०३८७१३८८३