‘लोकसेवा’कडून वाङ्मयचौर्य झाले नाही; स्पर्धा परीक्षेच्या क्लास नोट्सच्या कॉपीराईट वादावर न्यायालयाचा निर्णय

पुणे : स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी लोकसेवा पब्लिकेशनने प्रकाशित केलेली ‘क्लास नोट्स भारतीय अर्थव्यवस्था’ आणि ‘क्लास नोट्स राज्यघटना’ ही दोन्हीही पुस्तके आप्पा उर्फ हनमंत हातनूरे यांनी स्वतः लिहिलेली असून त्यात कोणत्याही स्वरूपाचे कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन झाले नाही, असा निकाल जिल्हा सत्र न्यायालयाने दिला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत लोकसेवा पब्लिकेशनचे लेखक आप्पा हातनुरे, संपादक साईनाथ डहाळे, प्राध्यापक शरद गायके, ऍड. अभिजीत देसाई (मुंबई उच्च न्यायालय) यांनी ही माहिती दिली.

आप्पा हातनुरे म्हणाले, “लोकसेवा पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या पुस्तकांत रंजन कोळंबे यांच्या पुस्तकातील मजकूर घेऊन क्लास नोट्स लिहिल्याचा आरोप भगीरथ प्रकाशनाकडून करण्यात आला होता. मात्र, कोळंबे यांच्या पुस्तकातील कोणत्याही स्वरूपाचा मजकूर आम्ही कॉपी केलेला नव्हता. ‘क्लास नोट्स भारतीय अर्थव्यवस्था’ आणि ‘क्लास नोट्स राज्यघटना’ ही दोन्हीही पुस्तके २०१२ ते २०२४ पर्यंतच्या माझ्या अभ्यासातून, तसेच ‘एमपीएससी’च्या १०-१२ पूर्व परीक्षा व काही मुख्य परीक्षा पास झालेल्या अनुभवातून स्वतः लिहिलेली आहेत. तरीही फिर्यादीने कमर्शियल सूट दाखल करत आमच्या पुस्तकांवर बंदी आणण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने तात्पुरत्या स्वरूपात पुस्तकांवर बंदी घालून आमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी वेळ दिला. त्यानुसार, यासंदर्भातील सर्व पुरावे, कॉपीराईट प्रमाणपत्रे आम्ही न्यायालयाला सादर केली. कॉपीराईट कायद्यातील कलम ५१ अन्वये लोकसेवा पब्लिकेशनची पुस्तके संरक्षित असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवत ही बंदी उठवली. तसेच ‘शब्द न शब्द’ कॉपी केल्याचा कोळंबे यांचा आरोप पुराव्यांमध्ये आढळून आला नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे लोकसेवा पब्लिकेशनची पुस्तके अथवा क्लास नोट्स या अधिकृत आहेत.”

साईनाथ डहाळे म्हणाले, “फिर्यादी कोळंबे यांनी केलेल्या आरोपानुसार, ‘भारतीय अर्थव्यवस्था’ व ‘भारतीय राज्यघटना आणि प्रशासन’ या दोन्ही पुस्तकांच्या कॉपीराईटचे मूळ प्रमाणपत्र सादर करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी केवळ ‘भारतीय अर्थव्यवस्था’ या पुस्तकाच्या प्रमाणपत्राचे झेरॉक्स प्रत सादर केली. दुसऱ्या पुस्तकाचे प्रमाणपत्र ते सादर करू शकले नाहीत, हेही न्यायालयाने सुनावणी करताना अधोरेखित केले आहे.”

लोकसेवा अकॅडमी व पब्लिकेशन नेहमीच गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी कार्य करत असते. त्यांनी २०१७ पासून आजवर हजारो विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिले आहेत. शिष्यवृत्ती योजना राबवली आहे. त्यांची पुस्तके व नोट्स महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत, त्यांची शिकवण्याची पद्धत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना समजेल, अशी आहे. यामुळे ते अल्प कालावधीमध्ये विद्यार्थीप्रिय झाले. त्यामुळेच या व्यावसायिक निराशेतून एमपीएससीसाठी शिकवणारे भगीरथ अकॅडमी व पब्लिकेशन यांनी लोकसेवा अकॅडमी व पब्लिकेशनवर खोटे आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. पण माननीय न्यायालयाने त्यांचा हा प्रयत्न विफल ठरवला, असे हातनुरे व डहाळे म्हणाले.