फ्रान्सच्या सीनेटमध्ये ‘भारत गौरव पुरस्कार’ देऊन सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा सन्मान !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ व श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी स्वीकारला पुरस्कार

        पॅरिस (फ्रान्स) – अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी अविरत झटणारे, साधनेविषयी दिशादर्शन करून जगभरातील साधकांचे जीवन आनंदमय करणारे, विज्ञानयुगात सोप्या सुलभ भाषेत अध्यात्माचा प्रसार करून समाजाला दिशादर्शन करणारे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना ५ जून २०२४ या दिवशी फ्रान्सच्या सीनेटमध्ये (संसदेमध्ये) ‘भारत गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. फ्रेंच संसदेचे उपाध्यक्ष डॉमिनिक थिओफिल, मेहेंदीपूर बालाजी ट्रस्टचे श्री नरेश पुरी महाराज, ‘संस्कृती युवा संस्थे’चे अध्यक्ष पं. सुरेश मिश्रा आणि फ्रेंच संसदेचे सदस्य फ्रेडरिक बुवेल यांच्या हस्ते भारतीय संस्कृती आणि परंपरा यांच्या जागतिक प्रसारासाठी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या वतीने त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ‘संस्कृती युवा संस्थे’ने या पुरस्कारासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची निवड केली होती.

      या वेळी ‘संस्कृती युवा संस्थे’चे अध्यक्ष पंडित सुरेश मिश्रा म्हणाले की, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी भारतीय संस्कृतीसाठी दिलेले योगदान अद्वितीय आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सनातन संस्थेने अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे समाजात जागरूकता अन् सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे.



सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी अखिल मानवजातीच्या कल्याणार्थ केलेल्या दिव्य कार्याचा सन्मान !

      हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ म्हणाल्या, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना फ्रान्सच्या सिनेटमध्ये ‘भारत गौरव पुरस्कारा’ने सन्मानित केल्याविषयी सनातन संस्था ही ‘संस्कृती युवा संस्था’ आणि संस्थेचे अध्यक्ष पं. सुरेश मिश्रा यांच्याप्रती कृतज्ञ आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासम उच्च पातळीचे संत हे पुरस्कार आणि मानसन्मान यांच्या पलीकडे गेलेले असले, तरी त्यांचा झालेला हा सन्मान म्हणजे त्यांनी अखिल मानवजातीच्या कल्याणार्थ केलेल्या दिव्य अध्यात्मकार्याचा सन्मान आहे. हा सन्मान म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अध्यात्मशास्त्राविषयी केलेले अलौकिक संशोधनकार्य आणि ग्रंथलेखन, तसेच अखिल मानवजातीला शीघ्र आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी दिलेला ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग यांचाच आज एकप्रकारे गौरव झाला आहे, असे आम्ही मानतो.’