एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची पुण्यात सभा

पुणे : पुण्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे,महायुतीसाठी नरेंद्र मोदी यांची तर महाविकास आघाडीसाठी राहुल गांधी,शरद पवार,उद्धव ठाकरे यांच्या जंगी सभा पुण्यात झाल्या. एमआयएम पक्ष्याचे उमेदवार अनिस सुंडके यांच्या प्रचारानिमित्त येत्या आठवड्यात ७ तारखेला एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी पुण्यात येणार आहेत. पुण्याच्या मध्यवर्ती भागात त्यांच्या सभेचे आयोजन केले जाणार आहे,सभेचे ठिकाण अजून निश्चित करण्यात आले नसल्याची माहिती अनिस सुंडके यांनी दिली.

आज पुण्यात अनिस सुंडके यांच्या प्रचारानिमित्त बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. क्वार्टर गेटपासून,जुना बाजार मार्गे कागदीपुरा येथून कसब्यातील धाकटा शेख सल्ला दर्ग्याच्या येथे रॅलीचा समारोप झाला. रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांचा सहभाग होता. ठिकठिकाणी नागरिकांनी फटाके वाजवून तसेच उमेदवार अनिल सुंडके यांना हार घालून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

रॅलीच्या समारोपा दरम्यान सुंडके म्हणाले “आमच्यावर आम्ही भाजपाची बी टीम आहोत असा आरोप केला जातो मात्र भाजपा ही ए आणि काँग्रेस ही बी टीम आहे,आम्ही तर एकटे लढत आहोत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तीन-तीन पक्ष एकत्र लढत आहेत, आम्ही मात्र आमच्या मुस्लिम,दलित,ख्रिश्चन अश्या अल्पसंख्यांक बांधवांसाठी एकटे लढत आहोत”