राहुल तेवातिया आणि राशिद खाननं राजस्थानच्या हातून विजय आणला खेचून

जयपूर : राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात 24 वी मॅच पार पडली आहे.  गुजरात टायटन्सनं  टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेत राजस्थानला फलंदाजीला आमंत्रित केलं होतं. राजस्थानचे सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर बाद झाल्यानंतर संजू सॅमसन आणि रियान परागनं डाव सावरला. रियान परागनं 76 धावा केल्या तर संजू सॅमसननं नाबाद 68 धावा केल्या. या धावांच्या जोरावर राजस्थाननं गुजरातसमोर 3 बाद 196 धावांचा डोंगर उभारला. राशिद खान वगळता गुजरातचे इतर बॉलर्स चांगली कामगिरी करु शकले नाहीत. त्यामुळं राजस्थानला धावांचा डोंगर उभा करता आला. 196 धावांचा पाठलाग करणाऱ्या गुजरातनं सावध आणि आक्रमक सुरुवात केली होती.  मात्र, कुलदीप सेननं बॉलिंगद्वारे राजस्थनला बॅक फूटवर ढकललं. शुभमन गिलला 72 धावांवर असताना युजवेंद्र चहलनं बाद केलं.  यानंतर राहुल तेवातिया आणि राशिद खाननं राजस्थानच्या हातून विजय खेचून आणला. 

गुजरातच्या संघानं डावाची सुरुवात आक्रमकपणे केली होती. राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसन यानं कुलदीप सेनला संधी दिली होती. कुलदीप सेननं संजू सॅमसनचा विश्वास सार्थ ठरवत  राजस्थानला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानं साई सुदर्शनला 35 धावांवर बाद केलं. यावेळी संजू सॅमसनचा डीआरएसचा निर्णय यशस्वी ठरला. त्याच कुलदीप सेननं पुढील ओव्हरमध्ये गुजरातला आणखी दोन धक्के दिले. मॅथ्यू वेडला आणि अभिनव मनोहरला कुलदीप सेननं बाद केलं यामुळं राजस्थाननं मॅचमध्ये कमबॅक केलं होतं. मात्र, कुलदीप सेननं 19 व्या ओव्हरमध्ये 20 धावा दिल्या आणि मॅच राजस्थानच्या हातातून निसटली.

युजवेंद्र चहलनं विजय शंकर याला 16 धावांवर बाद केलं. त्यानंतर युजवेंद्र चहलनं गुजरातचा कॅप्टन शुभमन गिलला 72 धावांवर बाद केलं. शुभमन गिलच्या रुपानं गुजरातला मोठा धक्का बसला. शाहरुख खाननं फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला मात्र आवेश खाननं त्याला बाद केलं. 

राजस्थाननं पहिल्यांदा बॅटिंग केली तेव्हा त्यांचे सलामीवीर यशस्वी जयस्वाल 24 धावा करुन बाद झाला. तर, गेल्या मॅचमध्ये आरसीबी विरुद्ध शतक झळकवणारा जोस बटलर मोठी धावसंख्या उभारु शकला नाही त्यानं 8 धावा केल्या.  रियान परागनं आणि संजू सॅमसननं केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थाननं 20 ओव्हरमध्ये 3 बाद 196 धावा केल्या होत्या.