खंडणी दिली नाही म्हणून चाकूने केले वर; तर… तर…मृतदेह जाळून खड्ड्यात पुरला!

पुणे – तरुणीचे तिच्याच महाविद्यालयातील एका तरुणाने अपहरण करून खून केला. त्यानंतर साथीदारांच्या मदतीने तिचा मृतदेह अहमदनगर जिल्ह्यातील कामरगावच्या हद्दीतील मोकळ्या जागेत जाळून खड्ड्यात पुरला. खंडणीच्या उद्देशानेच तरुणीचा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, तिघांना अटक करण्यात आल्याची अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.

भाग्यश्री सूर्यकांत सुडे (वय २२, रा. साकोरेनगर, विमाननगर) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती मूळची लातूर जिल्ह्यातील हरंगुळ बुद्रूक येथील रहिवासी आहे. याबाबत तरुणीचे वडील सूर्यकांत ज्ञानोबा सुडे (वय ४९, रा. हरंगुळ बुद्रूक, जि. लातूर) यांनी विमाननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तर शिवम माधव फुलवळे (वय २१, रा. ऑक्सी हेवन सोसायटी, रायसोनी महाविद्यालयाजवळ, वाघोली), सुरेश शिवाजी इंदोरे (वय-२३, रा. मुंबई, मूळ रा. सकनूर, ता. मुखेड, जि. नांदेड) आणि सागर रमेश जाधव (वय-२३, रा. कासलेवाडी, ता. शिरूर अनंतपाळ, जि. लातूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्री वाघोलीतील रायसोनी महाविद्यालयात बी.ई. संगणक अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. ३० मार्च रोजी तिने आईला फोन करुन मैत्रिणीच्या वाढदिवसाला फिनिक्स मॉलमध्ये जात असल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी आईने तिच्याशी संपर्क साधला. परंतु तिचा मोबाईल बंद लागत होता.

त्यानंतर अपहरणकर्त्यांनी दोन एप्रिलला तरुणीच्या मोबाईलवरून वडिलांना मेसेज पाठविला. तुमच्या मुलीचे अपहरण केले असून, नऊ लाख रुपये खंडणी न दिल्यास तिला जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. याबाबत तरुणीच्या वडिलांनी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली विमाननगर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. पोलिसांनी त्या मेसेजचे तांत्रिक विश्लेषण केले.

तो मेसेज मुंबईतील जोगेश्वरी परिसरातून आल्याचे समजले. पोलिसांनी त्या परिसरात आरोपींचा शोध घेतला. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त प्रवीण पवार, अतिरिक्त पोलिस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक आयुक्त आरती बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) सर्जेराव कुंभार करीत आहेत.

मोबाईल कॉल डिटेल्सवरून धागेदोरे हाती

तरुणीचे बँक खाते आणि मोबाईल कॉल्सच्या तांत्रिक विश्लेषणातून पोलिसांना तरुणीच्या खुनाचे धागेदोरे हाती लागले. पोलिसांनी वाघोली परिसरातून तिच्या ओळखीचा शिवम फुलवळेला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान शिवमने त्याचे दोन साथीदार सुरेश इंदुरे आणि सागर जाधवच्या मदतीने खंडणीसाठी गुन्हा केल्याचे सांगितले. त्यानुसार त्याच्या साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली.

मोटारीतच केला खून

आरोपी शिवमने भाग्यश्रीचा मोटारीतच खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने साथीदारांच्या मदतीने अहमदनगर जिल्ह्यातील कामरगावच्या हद्दीत मोकळ्या जागेत खड्डा खोदून मृतदेह जाळून त्यात पुरल्याचे पोलिसांना सांगितले. आरोपीने ते ठिकाण पोलिसांना दाखवले. त्यानुसार अहमदनगरचे तहसीलदार आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यासमक्ष मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला.

पैशांच्या लालसेपोटी खून

आरोपी शिवमने पैशांच्या लालसेपोटी भाग्यश्रीचे अपहरण करून खंडणी उकळण्याचा कट रचला. त्याने साथीदारांच्या मदतीने अपहरण केल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपी शिवम फुलवळे हा त्याच महाविद्यालयात बी.ई. अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. तर अन्य दोघा आरोपींपैकी एकजण डिप्लोमा उत्तीर्ण असून, एकजण बारावी उत्तीर्ण आहे. खंडणीच्या उद्देशानेच तरुणीचा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या गुन्ह्यात इतर आरोपी असण्याची शक्यता असून, त्या अनुषंगाने पोलिस तपास करीत आहेत.