आंबेडकर जयंतीनिमित्त बावधनमध्ये चार दिवसीय ‘भीम फेस्टिवल’

पुणे : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, अखिल बावधन विकास प्रतिष्ठान व सुजाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त चार दिवसीय ‘भीम फेस्टिवल २०२४’चे आयोजन केले होते. आयोजक उमेश कांबळे यांच्या पुढाकारातून सिद्धार्थनगर बावधन बुद्रुक येथे ११ ते १४ एप्रिल २०२४ या कालावधीत भीमगीते, शाहिरी जलसा, लाईव्ह कॉन्सर्ट व भव्य मिरवणुकीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

महोत्सवाची सुरुवात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पहार अर्पण करून व सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन झाली. प्रसंगी झी युवा संगीत सम्राट फेम अजय देहाडे प्रस्तुत ‘काळजावर कोरले नाव’ या लाईव्ह कॉन्सर्टद्वारे बुद्ध-भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी संगीतकार जॉली मोरे व शाहीर सीमाताई पाटील यांचा भारतीय संविधानाची गौरवगाथा सांगणारा ‘वुई द पीपल’ या शाहिरी जलसाचे सादरीकरण झाले. तिसऱ्या दिवशी विशाल-साजन यांचा लाईव्ह कॉन्सर्ट बावधनकारानी अनुभवला. रविवारी जयंतीदिनी भव्य मिरवणूक काढण्यात आली. एसबीआय बँक एनडीए रोड ते बावधन सिद्धार्थनगर या दरम्यान निघालेल्या मिरवणुकीत संपूर्ण बावधनकर, आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले. तसेच मिरवणुकीनंतर सर्वांना अन्नदान करून भीम फेस्टिवलची सांगता झाली.

रिपाइं नेते परशुराम वाडेकर व विजय बापूसाहेब ढाकले यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक सोन्याबापु देशमुख, बावधन पोलीस चौकीचे निरीक्षक सोमनाथ पांचाळ, राकेश सरडे, मनोज गोसावी, राजेंद्र कुरणे, इंस्टाग्राम स्टार भीमकन्या दिव्या शिंदे यांनी महोत्सवाला सदिच्छा भेट दिली. यावेळी बावधनच्या सरपंच वैशाली कांबळे, स्वराज कांबळे, रेखाताई सरोदे, आशाताई भालेराव, विशाल शेळके, नामदेव ओव्हाळ, बाळासाहेब खंकाळ, वसंतराव ओव्हाळ, अमोल जगताप, केशवराव पवळे, सचिन टाकले, अर्चनाताई चंदनशिवे, बाबासाहेब तुरुकमारे, सुनील वडवेराव, बाळकृष्ण कांबळे, आनंदा कांबळे आदी उपस्थित होते.