धनंजय दिलीप आबनावे यांना वाणिज्य शाखेमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएचडी

पुणे : फुरसुंगी येथील धनंजय दिलीप आबनावे यांना वाणिज्य विद्या शाखेअंतर्गत व्यवसाय प्रशासन विषयामध्ये नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान करण्यात आली. ‘महाराष्ट्र शासनाच्या रमाई आवास योजनेची व्यवस्थापन कार्यपध्दती व अंमलबजावणीचा विश्लेषणात्मक अभ्यास’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. श्री शाहू मंदिर महाविद्यालय येथील प्राध्यापक डॉ. किशोर गिरीश नवले यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. धनंजय आबनावे हे मूळचे फुरसुंगी गावचे असून, सध्या ते नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई येथे लेखाधिकारी पदावर कार्यरत आहेत. डॉ. धनंजय आबनावे यांचे एमकॉम, बीएड, एमए (अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, शिक्षणशास्त्र, लोकप्रशासन), सेट-नेट (वाणिज्य, अर्थशास, शिक्षणशास्त्र), सेट (राज्यशास्त्र), नेट (इतिहास), डीएसएम, जीडीसीए अशा एकूण १८ पदव्या आणि आता पीएचडी इतके शिक्षण झाले आहे. खडतर परिस्थितीतून डॉ. आबनावे यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे फुरसुंगी पंचक्रोशीमधून, त्यांच्या मित्रपरिवाराकडून, नातेवाईकांकडून कौतुक होत आहे.

यावर बोलताना डॉ. धनंजय आबनावे म्हणाले, “माझ्या आईवडिलांनी केलेल्या मेहनतीमुळे व दिलेल्या संस्कारांमुळे आज इथपर्यंत पोहचलो आहे. शिक्षणाचे महत्त्व जाणून शिक्षण घेत गेलो. शिक्षण हेच प्रगतीचे व प्रबोधनाचे साधन असून प्रत्येकाने शिक्षण घेतलेच पाहिजे.”