खंडणीसाठी अल्पवयीन मुलाला पळवलं, पोलिसांना प्रकार समजताच केले भयानक कृत्य, बदलापूरमध्ये खळबळ

खंडणीसाठी एका नऊ वर्षाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या झाल्याची घटना वांगणीत उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कुळगाव बदलापूर ग्रामीण पोलिसांनी (Police) एका कुटुंबातील सात संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. इबाद बुबेरे असे या मृत बालकाचे नाव आहे.

घर बांधण्यासाठी पैशाची गरज होती. त्याकरीता गावातील तरुण सलमान मौलवी आणि त्याचा भाऊ सफूआन मौलवी या दोघांनी इबादची हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे मृत इबादचे घर हे संशयित आरोपीच्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे. इबाद याची शोधाशोध सुरु झाली. त्याला घाबरूनच त्याची हत्या करण्यात आल्यचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

अल्पवयीन मुलाचे केले अपहरण 

याबाबत अधिक माहिती अशी की, बदलापूर नजीक असलेल्या वांगणी परिसरात गोरगाव आहे. सध्या रमजान सुरु असल्याने संपूर्ण गावातील लोक नमाज पठणासाठी गावातील मशीदीत जमा झाले. रात्री नमाज पठणाकरीता मुस्लीम बांधव मशीदीत होते. त्याचवेळी या गावातील नऊ वर्षीय मुलगा इबाद गायब झाला होता. इबादच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरु केला.

मुलाच्या वडिलांकडे 23 लाखांची मागणी 

त्यावेळी इबादचे वडील मुद्दसीर यांना फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, तुमचा मुलगा तुम्हाला जिवंत हवा असल्यास त्या बदल्यास 23 लाख रुपये द्या. त्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीचा फोन बंद झाला. मुद्दीसीर यांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. तोपर्यंत इबाद हा बेपत्ता झाल्याची चर्चा गावभर पसरली होती.

अल्पवयीन मुलाची हत्या, सात जण पोलिसांच्या ताब्यात 

एकीकडे पोलिसांकडून इबादचा शोध सुरु होता. तर दुसरीकडे ग्रामस्थांकडूनही इबादचा शोध घेतला जात होता. त्याचवेळी अपहरणकर्त्याने  त्याच्या मोबाईलमध्ये दुसरे सीम कार्ड टाकून फोन करण्याच्या प्रयत्न केला. तोपर्यंत त्याचे लोकेशन पोलिसांना समजले होते. पोलीस थेट त्यास गावातील फोन करणाऱ्या सलमान मौलवी यांच्या घरात दाखल झाले. पोलिसांनी शोधाशोध सुरु केली तर घराच्या मागच्या बाजूला एका खड्ड्यात गोणीत इबाद याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणात कुळगाव बदलापूर पोलिसांनी सलमान, सफूयान यांच्यासह पाच जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.