Man Killed Live In Partner : लिव्ह इन पार्टनरचा खून करुन तरुणानं स्वतःचा चिरला गळा : आठ वर्षापासून होते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये

नागपूर Man Killed Live In Partner : तरुणानं लिव्ह इन पार्टनरचा निर्घृण खून केल्यानंतर स्वतः देखील आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यातील बोरी पोलीस ठाणे अंतर्गत एमआयडीसीच्या बीड गणेशपूर इथं घडली आहे. रणजित नत्थू चौधरी असं आरोपीचं नाव आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा तरुण गेल्या आठ वर्षांपासून महिलेच्या तीन मुलांसह लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

मध्यप्रदेशातील आहेत तरुण आणि महिला : खून झालेली महिला मध्यप्रदेशच्या पांडुरणा येथील रहिवासी आहे. तर आरोपी रणजित हा देखील पांडुरणाचा रहिवासी आल्याची माहिती पुढं आली आहे. मृतक आणि आरोपी रणजित मागील सुमारे आठ वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे. मृत महिलेला तीन अपत्य आहेत, ते देखील त्यांच्यासोबत राहात होते. सोमवारी मृत महिला आणि रणजित यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं. आज सर्वकाही सुरळीत झालं. मात्र, सोमवारी झालेल्या वादाचा राग मनात धरुन आरोपी रणजितनं धारदार चाकूनं भोसकून महिलेची हत्या केली. महिला मृत झाल्यानंतर आरोपीनं देखील त्याच चाकूनं स्वतःचा गळा चिरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. घटनेची माहिती मिळताच बोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी रणजितला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गेल्या आठ वर्षांपासून होते संबंध : आरोपी रणजित आणि मृतक महिला हे गेल्या आठ वर्षांपासून सोबत राहायचे. मात्र, रणजित हा कामाच्या निमित्तानं पुणे इथं राहायचा. तो अधूनमधून महिलेला भेटण्यासाठी नेहमीच नागपुरातील बीड गणेशपूर इथं यायचा. गेल्या एक महिन्यांपासून तो पुण्याला गेलाच नाही. तो तिच्यासह राहत होता. पतीपत्नी सारखं दोघंही राहत होते. पण त्यांच्यात कोणत्या कारणामुळं वाद झाला, याबाबत पोलीस तपास करत आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा तपशील जाणून घेतला.