या जगात कुठेही काहीही होऊ शकतं. एखाद्या छोट्याशा मुद्यावरून रणकंदनही होऊ शकतं. याचाच प्रत्यय कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यात आला, तेथे एक अजबच घटना घडली. तेथे एक इसम त्याच्या पत्नीला शॉपिंगसाठी घेऊन आला, पण शॉपिंग राहिल बाजूला त्या युवकाने थेट दुकानदाराचीच धुलाई केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्या दुकानदाराची चूक फक्त एवढीच होती की तो त्या तरूणाच्या बायकोला, तिच्या आवडीची एकही साडी दाखवू शकला नाही. बास.. एवढचं.. बायकोला साडी आवडली नाही , ती नाराज आणि युवकाने थेट दुकानदारालाच चोपलं की राव ! मात्र या घटनेनंतर दुकानदाराने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर त्या युवकाविरोधात मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
ही घटना उत्तर कन्नडच्या सिरसी मार्केटमध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास घडल्याचे समजते. याप्रकरणी दुकानदार प्रकाश पटेल याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. रविवारी रात्री पटेल हा आपल्या कर्मचाऱ्यांसोबत दुकानात बसला होता. त्याचवेळी आरोपी मोहम्मद त्याच्या पत्नीला खरेदीसाठी घेऊन त्यांच्या दुकानात आला. त्याच्या सांगण्यावरून प्रकाशने दुकानात ठेवलेल्या उत्तमोत्तम साड्या दाखवल्या, मात्र आरोपीच्या पत्नीला त्यापैकी एकही आवडला नाही.
बायकोला एकही साडी न आवडल्यामुळे आरोपी वैतागला, त्यानंतर त्याने दुकनातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. प्रकाश यांनी आरोपीच्या या वर्तनाला विरोध दर्शवला पण तो काही तेथेच थांबला नाही. त्यानंतर आरोपी मोहम्मदने त्याच्या आणखी एका साथीदाराला बोलावलं आणि दुकानदार व इतर कर्मचाऱ्यांना थेट मारहाण केली. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैदा झाला. दुकानदार प्रकाश पटेल यांनी हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
हे फुटेज पाहून पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.आरोपी हा तो शिर्सी येथील नेहरू नगर येथे राहणारा आहे. एका साडीवरून झालेल्या या महाभारताची बरीच चर्चा सुरू आहे. या घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लोकांनी विविध कमेंट्सही दिल्या आहेत