मुंबईमधून (Mumbai) अल्पवयीन मुलीवरील बलात्काराची (Rape) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पार्कसाइट पोलिसांनी दोन भावांना अटक केली आहे. दोघांची वये अनुक्रमे 22 आणि 18 वर्षे आहेत. या भावांवर आरोप आहे की, त्यांनी त्यांच्या 13 वर्षीय चुलत बहिणीवर वारंवार बलात्कार केला, ज्यामध्ये ती गर्भवती राहिली. अहवालानुसार, ही मुलगी विक्रोळीतील एका सोसायटीत तिच्या आई-वडिलांसोबत राहते. मुलीचे वडील आणि आई दोघेही नोकरी करतात. त्यामुळे विक्रोळीमध्येच राहणारे तिचे चुलत भाऊ तिला कंपनी देण्यासाठी वारंवार घरी येत होते.
मुलीच्या आई-वडिलांचा समज होता की, या तिघांचे चांगले कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत मुलांचे घरी येणे त्यांना खटकले नाही. 31 डिसेंबर रोजी मुलीच्या आईच्या लक्षात आले की तिचे पोट थोडे वाढले आहे. याबाबत तिला विचारले असता, मुलीने योग्य प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे आईने तिला रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. मुलीची जेव्हा रुग्णालयात तपासणी केली गेली तेव्हा ती 23 आठवड्यांची गरोदर असल्याचे समोर आले.
त्यानंतर याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी मुलगी आणि तिच्या पालकांचे जबाब नोंदवले आणि दोन्ही चुलत भावांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला. आपल्या निवेदनात मुलीने म्हटले आहे की, 18 वर्षीय चुलत भावाने मे महिन्यात पहिल्यांदा तिच्यावर बलात्कार केला. दुसरा आरोपी, वय 22, याने ऑगस्टमध्ये तिच्यावर बलात्कार करण्यास सुरुवात केली. मुलीने सांगितले की, दोघे तिच्यावर बलात्कार करण्यापूर्वी तिला अश्लील व्हिडिओ आणि फोटोज दाखवत असत.
मुलीने सांगितले की दुसऱ्या आरोपीने तिच्यावर वारंवार बलात्कार केला आणि पहिल्याने अनेक वेळा लैंगिक छळ केला. आरोपपत्रात मुलीचा वैद्यकीय अहवाल पुरावा म्हणून वापरला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. दुसऱ्या आरोपीला त्याच दिवशी (रविवार 31 डिसेंबर) अटक करण्यात आली, तर त्याच्या किशोरवयीन भावाला सोमवारी अटक करण्यात आली. दोन्ही भावांवर अनेक कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत.