बहीण-भावाच्या नात्याची गोष्ट अनोखी,’निवेदिता, माझी ताई!’

पुणे , १२ जानेवारी २०२४ : मालिका  आणि  प्रेक्षक  यांचं  अतूट  नातं  विणणारी  लोकप्रिय  वाहिनी  म्हणजे  सोनी  मराठी .  नव्या  वर्षाच्या सुरुवातीलाच  मोठ्या  दिमाखात  सोनी मराठीने आणखी एका मालिकेची  घोषणा  केली  आहे .  आशय  आणि  विषय  यांनी  समृद्ध  असणार्‍या  मालिकांची  परंपरा  जपणाऱ्या  सोनी  मराठी  वाहिनीवर  नात्यांची सुरेख  गुंफण  बांधलेली  नेहमीच  पाहायला  मिळते . अशाच  एका  गोड  नात्याची  मजेशीर  गोष्ट  लवकरच सोनी मराठीवर  येणार आहे. एका  अशा  नात्याची  गोष्ट जी घराघरांत  घडते .. एक  असं  नातं  ज्यामुळे  प्रत्येक घराला घरपण  लाभतं .. असं  एक  निरपेक्ष  नातं  जे  एकमेकांवर  जीव  ओवाळून  टाकतं …  ते  नातं  म्हणजे … बहीण आणि भाऊ  यांचं  अतूट  नातं . आजवर  संपूर्ण  मालिका  बहीण  आणि  भाऊ  यांच्या  अनोख्या  प्रेमावर  क्वचितच  आली  असेल  आणि  नेमकी  हीच बाब हेरत, सोनी मराठी प्रथमच ‘निवेदिता, माझी ताई!’ ही सुंदर मलिका वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच १५ जानेवारीपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येते आहे.

   छोटेसे बहीण-भाऊ, उद्याला मोठाले होऊ… या कवितेच्या ओळी आठवल्या की मनात आपल्या बालपणीच्या आठवणी हमखास दाटून येतात. रिमोटवरून भांडणारी.. एकमेकांची गुपिते आई-बाबांपासून  कधी  लपवणारी  तर  कधी  त्याच  गुपितांच्या  जोरावर  ब्लॅकमेल  करणारी..  एकमेकांना  छळणं   हा  आपला  जन्मसिद्ध  हक्क  मानणारी  अशी  भावंडं  प्रत्येकाच्या  हृदयातला  एक  मोठा  कप्पा  व्यापतात.  कितीही  भांडली तरीही बहीण-भावाचं नातं म्हणजे ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ असंच काहीसं असतं. मात्र दशमी क्रिएशन्स प्रस्तुत ‘निवेदिता, माझी ताई!’ ही मालिका थोडी वेगळी आहे. बहीण-भावाच्या  नात्याची  ही गंमत लवकरच उलगडणार असून तत्पूर्वी मालिकेचे मजेशीर प्रोमोज सध्या सोनी मराठीवर पाहायला मिळत आहेत. त्यांना प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मालिका सुरू होण्याआधीच मिळाली आहे.

‘निवेदिता, माझी ताई!’ या मालिकेमध्ये मोठ्या बहिणीच्या भूमिकेत एतशा संझगिरी आणि तिच्या लहान भावाच्या भूमिकेत रुद्रांश चोंडेकर यांची अप्रतिम केमिस्ट्री रसिक प्रेक्षकांच्या मनावर  राज्य  करेल  यात  काही शंका नाही. या मालिकेमध्ये अशोक फळदेसाई एका डॅशिंग तरुणाच्या भूमिकेत म्हणजेच यशोधनच्या भूमिकेत दिसणार आहे. यशोधन आणि निवेदिता यांची मॅजिकल लव्हस्टोरी ही या मालिकेचा  टर्निंग  पॉइंट  असणार आहे. निवेदिता, असीम आणि यशोधन या तिघांच्या प्रेमाची एक आगळीवेगळी गोष्ट ‘निवेदिता, माझी ताई!’ या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. असीमची लाडकी ताई आणि यशोधनची  स्वप्नपरी  या  दोघांच्या निर्व्याज प्रेमात निवेदिताला तारेवरचीच कसरत करावी लागणार हे नक्की. कधी प्रेमाने तर कधी लबाडीने आपल्या निवेदिता ताईला कायम आपल्याजवळ ठेवू पाहणारा असीम आणि निवेदितासोबत आपल्या भावी आयुष्याची स्वप्नं पाहणारा यशोधन यांची गमतीशीर गोष्ट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात काही शंका नाही.

‘निवेदिता, माझी ताई!’ १५ जानेवारीपासून रात्री ९ वा.फक्त सोनी मराठी वाहिनीवर!