भारताचे तुकडे होऊ द्यायचे नसतील तर ‘हिंदु राष्ट्रा’ शिवाय पर्याय नाही ! – श्री. शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
पुणे – गोवा येथे गेल्या 11 वर्षापासून होणाऱ्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामुळे हिंदु राष्ट्राची चर्चा आता केवळ भारतातच नाही, तर वैश्विक पातळीवर प्रारंभ झाली आहे. यामध्ये आता हिंदु राष्ट्राची मागणी करणारी अनेक व्यासपिठे निर्माण झाली आहेत; मात्र दुसरीकडे देशात जिहादी आतंकवाद्यांना मोठ्या प्रमाणात अटक होत आहे. पंजाबमध्ये खलिस्तानवादी पोलीस प्रशासनाला आव्हान देत आहेत. हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्या करत आहेत तर मणिपूर, नागालँड यांसारख्या राज्यांतील हिंदूंची घरे जळत आहेत. काश्मीरमध्येही हिंदू सुरक्षित झालेला नाही. देशभरात साक्षी, अनुराधा श्रद्धा वालकर यांसारख्या असंख्य हिंदू मुलींच्या ‘लव्ह जिहाद’ कडून होणाऱ्या निर्घुण हत्या पाहता देशातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. असे दिसते. ‘दी केरला स्टोरी या चित्रपटाने मांडलेले वास्तव केवळ केरळ राज्यापुरते मर्यादित नसून या जिहादी षड्यंत्राची व्याप्ती देशभरात मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहे. एकीकडे हिंदूंनी भाषण केले की, लगेचच त्यांच्यावर ‘हेट स्पीच’चा गुन्हा दाखल केला जाती मात्र ‘सर तन से जुदा’ करण्याच्या उघड घोषणा देणाऱ्यांवर कारवाई होतांना दिसत नाही. दुसरीकडे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या तपासात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ आणि ‘आय. एस. आय.एस.’ हे भारताला वर्ष 2047 पर्यंत इस्लामी राष्ट्र बनवण्याचे षड्यंत्र रचत असल्याचे उघड झाले आहे. अशा स्थितीत हिंदु धर्म हा एकमात्र धर्म आहे की, जो समाजाला जोडू शकतो, तो विश्वबंधुत्वाची आणि ‘वसुधैव कुटुंबकमची’ संकल्पना मांडू शकतो. त्यामुळे भारताचे पुन्हा तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर भारताला आदर्श रामराज्य अर्थात् हिंदु राष्ट्र बनवण्याशिवाय पर्याय नाही म्हणूनच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतीवर्षीप्रमाणे 16 ते 22 जून 2023 या कालावधीत श्री रामनाथ देवस्थान, फोंडा, गोवा येथे एकादश अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे श्री. शंभू गवारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी सनातन संस्थेचे प्रा. विठ्ठल जाधव हेही उपस्थित होते. पत्रकार भवन, गांजवे चौक, पुणे येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस स्वातंत्रवीर सावरकर युवा विचार मंच केडगावचे डॉ. निलेश लोणकर, अधिवक्त्या सीमा साळुंके तसेच रणरागिणी शाखेच्या कु.क्रांती पेटकर हेही उपस्थित होते.
या वेळी सनातन संस्थेचे प्रा. विठ्ठल जाधव म्हणाले की, यंदाच्या अधिवेशनामध्ये ‘हिंदु राष्ट्र संसद’ या वैशिष्ट्यपूर्ण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. विविध विषयांवरील तज्ञ मंडळींचे परिसंवाद, तसेच विशेष कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या मुलाखती हेही यंदाच्या अधिवेशनाचे विशेष आकर्षण असणार आहे. ‘हलाल सटीफिकेशन’, ‘लैंड जिहाद’, ‘काशी मथुरा मुक्ती’, ‘धर्मांतर’, ‘गोहत्या’, ‘गड-किल्ल्यांवरील इस्लामी अतिक्रमणे’, ‘मंदिर संस्कृतीचे रक्षण काश्मिरी हिंदूचे पुनर्वसन, पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूवरील अत्याचार’ यांसारख्या विविध विषयांसोबतच हिंदु राष्ट्राच्या पायाभरणीसाठी आवश्यक विषयांवर या महोत्सवामध्ये विचारमंथन होणार आहे.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. शंभू गवारे म्हणाले की, या अधिवेशनाला अमेरिका, इंग्लंड, इंडोनेशिया, सिंगापूर, बेल्जियम, बांग्लादेश आणि नेपाळ या देशांसह भारतातील 28 राज्यांतील 350 हून अधिक हिंदु संघटनांच्या 1500 हून अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने अमरावती येथील श्री रुक्मिणी वल्लभ पिठा’चे अनंत विभूषित श्री जगद्गुरु रामानंदचार्य श्री स्वामी रामराजेश्वराचार्यजी सरकारजी, विश्व हिंदु परिषदेचे देवगिरी प्रांताचे संपर्कप्रमुख धर्माचार्य ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे, छत्तीसगढ़ येथील ‘शदाणी दरबार’चे प.पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज, गोंदिया येथील ‘महात्यागी सेवा संस्थान’चे अध्यक्ष पू. महंत श्रीरामज्ञानीदास महात्यागी महाराज आदी संतांची वंदनीय उपस्थितीही या अधिवेशनाला लाभणार आहे.
याशिवाय प्रामुख्याने काशी येथील ज्ञानवापी मशिदीच्या विरोधात न्यायालयीन लढा देणारे अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन आणि त्यांचे सुपुत्र ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टीस’चे राष्ट्रीय प्रवक्ते अधिवक्ता विष्णु शंकर जैन, तेलंगाणा येथील हिंदुत्वनिष्ट आमदार टी. राजासिंह, माजी आमदार तथा ‘हिंदु इकोसिस्टिम’चे संस्थापक श्री कपिल मिश्रा यांच्यासह वरीष्ठ अधिवक्ता, उद्योजक, विचारवंत, लेखक, मंदिर विश्वस्त, तसेच अनेक समविचारी सामाजिक, राष्ट्रीय आणि आध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. तसेच आपल्या जिल्हयातील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता, उद्योजक, मंदिर विश्वस्त, मावळ्यांचे वंशज, इत्यादी मिळून 35 हुन अधिक हिंदुत्वनिष्ठ आणि संघटनांचे प्रमुख हेही उपस्थित रहाणार आहेत.
या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ Hindujagruti.org यादवारे तसेच समितीच्या HinduJagruti या यु-ट्यूब चॅनेल आणि facebook.com/hjshindi1 या फेसबुक द्वारेही केले जाणार आहे. जगभरातील हिंदुत्वनिष्ठांनी या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले.