विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात संस्थांचा पुढाकार महत्वाचा : चंद्रकांत पाटील

166
पुणे ८ नोव्हेंबर २०२२ : “कालानुरूप विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, कौशल्याभिमुख आणि सर्वांगीण विकासाचे शिक्षण देण्याची गरज आहे. या कार्यात शिक्षण संस्थांनी पुढाकार घेऊन शालेय वयापासूनच रोजगारक्षम व उद्यमशील विद्यार्थी घडविण्यावर भर द्यावा,” असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. बाणेर येथील भैरवनाथ शिक्षण संस्था संचलित आदित्य इंग्रजी माध्यम शाळेच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट देत संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती घेतली.
प्रसंगी भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवलाल ऊर्फ नाना धनकुडे, अध्यक्षा सुरेखा धनकुडे, सचिव विराज धनकुडे, खजिनदार राहूल धनकुडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा भोसले, माजी प्राचार्य अविनाश ताकवले, सल्लागार राजु आव्हाड व मुख्याध्यापिका रेखा काळे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या वतीने चंद्रकांत पाटील यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “गेल्या २२ वर्षात आदित्य इंग्रजी माध्यम शाळेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हजारो विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य देशासाठी महत्वपूर्ण असे आहे. धनकुडे यांनी शैक्षणिक प्रगतीसह संवेदनशील वृत्तीने सामाजिक कार्यातही भरीव योगदान दिले आहे. अनाथ व गरीब मुलामुलींना दत्तक घेऊन त्यांच्या विकासासाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे.”
शिवलाल उर्फ नाना धनकुडे म्हणाले, “विद्यार्थ्यांना चांगला नागरिक घडविण्याचा वसा यापुढेही आम्ही असाच घेऊन जाऊ. समाजातील वंचित घटकांना शिक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत आहे. बावीस वर्षाच्या या प्रवासात माझे सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचा वाटा महत्वाचा राहिला आहे.”