१९७१ च्या युद्धातील इंदिरा गांधी यांचे योगदान अविस्मरणीय : मंत्री सुनील केदार

126

सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहात १९७१ च्या युद्धातील वीर सैनिकांचा सन्मान

पुणे : “भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावेळी धाडसाने आणि धीराने प्रत्येक प्रश्न हाताळला. बांगलादेश मुक्ती संग्रामात इंदिराजींचे आणि माणिक शॉ यांच्या नेतृत्वातील भारतीय सैन्याचे मोठे योगदान आहे. देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा निर्णय घेत इंदिराजींनी भारताला प्रगतीपथावर नेतानाच शत्रू राष्ट्राला भारताकडे वाकड्या नजरेने बघू नका, असा इशारा दिला. स्वतंत्र भारताला मजबूत राष्ट्र म्हणून ओळख मिळवून देण्यात इंदिरा गांधी आणि भारतीय सैन्याचे अविस्मरणीय आहे,” असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले. इंदिराजींना खुद्द अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘दुर्गा’ अशी उपमा दिली होती, ही आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहांतर्गत १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील वीर सैनिकांचा, वीरमाता व वीरपत्नींना सुवर्ण विजय महोत्सवानिमित्त सन्मानित करण्यात आले. यावेळी संयोजक माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, प्रदेश कमिटीचे वीरेंद्र किराड, माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक विनोद मथुरावाला, लता राजगुरू, रफिक शेख, शेखर कपोते, प्रशांत सुरसे, चेतन अग्रवाल आदी उपस्थित होते.

सुनील केदार म्हणाले, “इतिहास नीटपणे माहित असेल, तर उज्ज्वल भविष्याचा प्रवास चांगला होतो. अनेक शूर-वीरांच्या बलिदानातून, योगदानातून हा स्वतंत्र भारत देश सक्षमपणे प्रगतीपथावर चालत आहे. मात्र, आजच्या पिढीतील अनेकांना स्वातंत्र्य लढ्याचे महत्व समजत नाही. त्यामुळे शूर-वीरांचा हा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीला नीटपणे सांगण्याची आवश्यकता आहे. सैन्यातील लोकांसोबत बोलताना सुद्धा स्फूर्ती चढते. देशाचा नागरिक म्हणून आपले कर्तव्य आणि जबाबदारी ओळखली पाहिजे. इतिहास समजून घेत, शूर-वीरांच्या कार्यातून प्रेरणा घेतली पाहिजे.  स्वातंत्र्यलढ्यासह पाकिस्तान, चीन यांच्यासोबत झालेल्या युद्धांचा इतिहास आपण अभ्यासला पाहिजे.”

प्रास्ताविकात मोहन जोशी म्हणाले, “युद्धातील वीर जवान, बलिदान दिलेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपत्नींचा सन्मान करताना आम्हाला अभिमान वाटतो. भारतीय सैन्याच्या १९७१ मधील या शौर्याचा स्वर्ण विजय महोत्सव आपण साजरा करतो.” कर्नल साळुंखे, कर्नल पाटील यांनीही आपले अनुभव सांगितले. लेखा नायर यांनी सूत्रसंचालन केले. चैतन्य पुरंदरे आभार मानले.

—————————————————————————————————

या वीरांचा झाला सन्मान

१९७१ च्या युद्धातील योगदानाबद्दल कर्नल सदानंद साळुंके, शहीद मेजर दडकर यांच्या वीरपत्नी गीता दडकर, कर्नल संभाजी पाटील, लेफ्टनंट कर्नल सुरेश शिंदे, सुभेदार संपत कोंडे, वायुदलातील रामचंद्र शेंडगे, विठ्ठल बाठे, शहीद हवालदार प्रल्हाद दिघे (वीरपत्नी लक्ष्मीबाई दिघे), शहीद लक्ष्मण जाधव, शहीद तुळशीराम साळुंके (वीरपत्नी मंगलाताई साळुंके), शहीद मारुती माने (वीरपत्नी श्रीमती माने), गोविंद मासाळकर यांना सन्मानित करण्यात आले. सोबतच शहीद सौरभ फराटे (वीरमाता मंगल फराटे), शहीद शिवाजी भोईटे (स्वप्ना भोईटे), मेजर लेखा नायर यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

——————————————————————————————————