होंडा रेसिंग इंडिया रायडर्स २०२३ एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या दुसऱ्या फेरीसाठी मलेशियाला रवाना 

61

मलेशिया : सात आठवड्यांपूर्वी थायलंडमध्ये झालेल्या २०२३ एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या (एआरआरसी) पहिल्या फेरीनंतर आता ही स्पर्धा दुसऱ्या फेरीसाठी सज्ज होत आहे. होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाची (एचएमएसआय) इदेमित्सु होंडा रेसिंग इंडिया टीम या वीकेंडला सेपांग इंटरनॅशनल सर्किटवर पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे.

आशियातील सर्वात अवघड रोड रेसिंग चॅम्पियनशीप म्हणून प्रसिद्ध असलेल्या एशिया प्रॉडक्शन २५०सीसी (एपी२५०सीसी) क्लासच्या पहिल्या फेरीत दमदार सुरुवात केल्यानंतर एकमेव भारतीय दुचाकी रेसिंग टीम नऊ पॉइंट्ससह आगामी फेरीत उतरणार आहे.

आगामी फेरीविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या प्रीमियम बिझनेस विभागाचे ऑपरेटिंग अधिकारी श्री. पी. राजागोपी म्हणाले, ‘२०२३ एआरआरसीच्या पहिल्या फेरीत केविन आणि मोहसिन यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केली. या दोन्ही तरुणांनी टीमसाठी गुण मिळवले. दुसऱ्या फेरीसाठी टीम आणि रायडर्स सज्ज आहेत. मोहसिनसाठी सेपांगचे वेगळे आव्हान असेल, कारण ते पहिल्यांदाच इथे रेसिंग करत आहेत. कविन यांना या ट्रॅकची ओळख असून त्या अनुभवाची त्यांना गुण मिळवण्यास मदत होईल. टीमने आपले धोरण आखले आहे आणि त्यानुसार दोन्ही रायडर्सना शक्य तितक्या वरती नेण्यासाठी प्रयत्न केले जातील. पहिल्या फेरीनंतर मिळालेल्या वेळेत आमच्या रायडर्सनी कसून मेहनत केली आहे. त्याच जिद्दीने ते पुढच्या फेरीत उतरणार आहेत.’

बुरीराम आंतरराष्ट्रीय सर्किटवर पहिल्या फेरीत कविन यांनी केलेल्या दमदार कामगिरीवरून त्यांची गुणवत्ता दिसून येते. चेन्नई रेसिंगमधून आलेल्या कविन यांनी पहिल्याच रेसमध्ये एक पॉइंट मिळवला आणि त्यानंतर दुसऱ्या रेसमध्ये आपल्या प्रभावी रायडिंगच्या मदतीने ११ वे स्थान मिळवले. हा १७ वर्षीय रायडर एकूण ६ पॉइंट्ससह दुसऱ्या रेसमध्ये उतरत असून स्कोअरबोर्डवर त्यांचे १३ वे स्थान आहे.

कविन यांच्याबरोबर मोहसिन पी हा नवा पण आश्वासक सहकारी दुसऱ्या फेरीत सहभागी होणार आहे. मल्लपुरममधन आलेल्या या तरुणाने एआरआरसीमध्ये पदार्पणातच ३ पॉइंट्ससह १७ वे स्थान मिळवले. आतापर्यंत मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर हा २० वर्षीय तरूण सेपांग इंटरनॅशनल रेसट्रॅकवर चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे.

पुढच्या फेरीविषयी कविन क्विंतल म्हणाले, सेपांग इंटरनॅशनल रेसट्रॅकवर परत उतरण्यासाठी मी उत्सुक आहे. स्वतःमधल्या कमकुवत गोष्टींवर मी काम केले असून एआरआरसीच्या दुसऱ्या फेरीत माझी कामगिरी चांगली होईल असा विश्वास वाटतो. नेहमीप्रमाणे सर्वोत्तम प्रयत्न करण्यावर माझा भर असेल. त्यामुळे प्रत्येक आउटिंगमध्ये कामगिरी उंचावणे व टीम तसेच देशासाठी पॉइंट्स मिळवणे शक्य होईल.

दुसऱ्या फेरीसाठी उत्सुक मोहसिन परांबेन म्हणाले, ‘मोटोजीपी ट्रॅकवर दुसऱ्या फेरीत सहभागी होण्यासाठी मलेशियात येताना मला खूप आनंद होत आहे. माझ्यासाठी हे नवे साहस असेल. माझे प्रशिक्षक आणि कुशल तंत्रज्ञांच्या मदतीने मी माझ्या कमकुवत गोष्टींवर काम केले आहे. या वीकेंडला जास्तीत जास्त पॉइंट्स मिळवण्यासाठी मी सज्ज आहे.