हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला उज्ज्वल भविष्य : प्रा. डॉ. संजय चोरडिया

117

सूर्यदत्ता कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, ट्रॅव्हल अँड टुरिझम व एशियन कंट्रीज चेंबर ऑफ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचा संयुक्त उपक्रम

पुणे : “हॉस्पिटॅलिटी क्षेत्राची व्याप्ती मोठी असून, या क्षेत्राशी संबंधित युवक, विद्यार्थी व इतर लोकांना सखोल माहिती, ओळख व्हावी, यासाठी ‘आकोही-पहचान’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमातून हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला नवसंजीवनी, आत्मसन्मान मिळेल. आगामी काळात हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला उज्ज्वल भविष्य आहे. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचालित सूर्यदत्ता कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, ट्रॅव्हल अँड टुरिझम (एससीएचएमटीटी) व एशियन कंट्रीज चेंबर ऑफ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री (आकोही) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आकोही-पहचान’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती ‘आकोही’ एशिया चे चेअरमन डॉ. सानी अवसरमल व ‘सूर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. संपूर्ण आशिया खंडात राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचा शुभारंभ पुण्यातून सूर्यदत्ता हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटपासून करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. सानी अवसरमल म्हणाले, “भारतात हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचे योगदान मोठे असून, जीडीपीमध्ये १२ टक्के भाग आहे. या क्षेत्रात नोकरीच्या मोठ्या संधी आहेत. सरकारी, खासगी आस्थापनांसह हॉटेल्स, रेस्टोरंन्टस, मॉल्स, विमानतळ, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी हॉस्पिटॅलिटी व्यवस्थापन आहे. कोरोनानंतर या क्षेत्रात येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, केटरिंग कॉलेज, हॉटेल मॅनेजमेंट यासह अन्य संस्थातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची, रोजगाराच्या विश्वासाची गरज असते. अनेकदा माहितीच्या अभावामुळे १०-२० टक्के विद्यार्थी पहिल्या वर्षातच अभ्यासक्रम सोडून देतात. तर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर हे क्षेत्र सोडणाऱ्यांची संख्या ४०-५० टक्के इतकी आहे. त्यामुळे कुशल मनुष्यबळ या क्षेत्राला मिळत नाहीत. ही दरी भरून काढण्यासाठी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीने पुढाकार घेतला असून, या क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि त्यांना सखोल माहिती देण्यासाठी हा विशेष उपक्रम आहे.”
या क्षेत्रातील हॉटेलांना, कंपन्यांना लागणारे मनुष्यबळ आणि उपलब्ध मनुष्यबळ यांच्यात कौशल्याचा अभाव असतो. हीच गरज ओळखून हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील जगातील पाहिले असे चेंबर असलेल्या एशियन कंट्रीज चेंबर ऑफ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीने पुढाकार घेऊन ‘आकोही-पहचान’ हा उपक्रम हाती घेतला आहे. ‘आकोही-पहचान’मधून या क्षेत्रातील विविध घटकांची ओळख करून दिली जाणार आहे. हॉस्पिटॅलिटी म्हणजे काय? त्यात कोणकोणत्या प्रकारचे काम असते? या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी काय आहेत? यामध्ये आजवर अनेकांनी नाव कमावले आहे, त्यांची ओळख करून दिली जाईल. स्थानिक पातळीवरील हॉटेल्स, रिसॉर्ट्स पासून पंचतारांकित हॉटेलांपर्यंत काम कसे चालते, याबाबत सांगणार आहोत. मुलांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे सोडवण्यासह त्यांना आधार व रोजगार देण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. विविध कार्यशाळा, चर्चासत्रे, समुपदेशन, तज्ज्ञांची व्याख्याने, या क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद, यशोगाथा उलगडण्यात येणार आहेत,” असेही डॉ. अवसरमल यांनी नमूद केले.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “कोरोनामुळे हॉस्पिटॅलिटी, पर्यटन यासह इतर अनेक क्षेत्रात मरगळ आली आहे. ही मरगळ झटकून पुन्हा जोमाने काम सुरु करण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरणार आहे. ‘सूर्यदत्ता’तर्फे सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले जाते. ‘एससीएचएमटीटी’मध्ये ‘आकोही-पहचान उपक्रमाची सुरुवात होत असल्याचा आनंद आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, करिअरमधील प्रगती होण्यास मदत होईल. या क्षेत्राशी संवाद आणि समज वाढण्यासाठी उपयुक्त ठरेल. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काम करणाऱ्यांचा आदर, सन्मान व्हायला हवा. या क्षेत्राशी आपल्या प्रत्येकाचा संबंध आहे.