हेरंब कुलकर्णी, सुषमा पाध्ये यांना ‘वसुधा परांजपे स्मृती पुरस्कार’ जाहीर

85
पुणे : विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी कार्यकारी विश्वस्त आणि व्यासंगी संपादक स्वर्गीय वसुधा परांजपे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘वसुधा परांजपे स्मृती पुरस्कार’ हेरंब कुलकर्णी, सुषमा पाध्ये यांना जाहीर झाला आहे. कुलकर्णी यांना समाजसेवेसाठी, तर पाध्ये यांना शिक्षण सेवेसाठी हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. प्रत्येकी ५० हजार रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
परांजपे कुटुंबीय आणि विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वतीने सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मूलगामी स्वरूपाचे काम करणाऱ्या दोन व्यक्तीना पुरस्कार देण्यात येतात. तसेच या पुरस्कार सोहळ्यात समितीच्या पाच विद्यार्थिनींनाही प्रत्येकी दहा हजार रुपये आर्थिक साहाय्य देण्यात येईल.
या पुरस्कारांचे वितरण रविवार, दि. १५ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता विद्यार्थी साहाय्यक समितीच्या फर्ग्युसन रस्त्यावरील डॉ. अ. शं. आपटे वसतिगृहातील मोडक सभागृहात होणार आहे. साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होईल, अशी माहिती प्रा. प्र. ना. परांजपे यांनी दिली.