हेमंती सहकारी गृहरचना संस्थेने उचलले स्वयं पुनर्विकासाचे शिव धनुष्य !

198
हेमंती सहकारी गृहरचना संस्थेने उचलले स्वयं पुनर्विकासाचे शिव धनुष्य !

पुणे : सहकारी गृहरचना संस्थेच्या सर्व सभासदांनी एकत्र येऊन दृढनिश्चय केल्यास ,एकजुट दाखविल्यास  स्वयं पुनर्विकास तत्त्वावर इमारत पुनर्बाधणी करता येऊ शकते, हे तुळशीबागवाले कॉलनी,सहकार नगर क्र.२ येथील ‘हेमंती ’ गृहरचना  संस्थेच्या  सभासदांनी दाखवून दिले आहे. संस्थेच्या सभासदांनी स्वयं पुनर्विकासाचे फक्त शिवधनुष्यच उचलले नाही, तर त्यादृष्टीने सकारात्मक पावले उचलून इतर संस्थांना प्रोत्साहित केले आहे.स्वयं पुनर्विकासाचा हा पुण्यातील पहिला प्रकल्प ठरला आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर २२ एप्रिल रोजी सकाळी ९.३०  वाजता झाले.

 ज्येष्ठ नेते उल्हास पवार,शासनाच्या नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड , पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन ,ज्येष्ठ आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी, ‘हेमंती ’ गृहरचना  संस्थेच्या  अध्यक्ष श्रीमती कल्पना लागू, सचिव शौनक ताम्हणे तसेच ‘इंटेलिजंट प्रोजेक्ट डिलिव्हरी सोल्युशन्स एलएलपीचे (आयपीडीएस ) हृषीकेश कुलकर्णी, विजय साने,सौ. अपूर्वा कुलकर्णी, आशिष मोहदरकर, अक्षय कुर्लेकर उपस्थित होते.

हेमंती गृहरचना संस्थेची स्थापना १९८४ साली झाली होती. संस्थेच्या सभासदांच्या नवीन; कालानुरूप गरजा, इमारतीचे वय व अन्य निकष लक्षात घेता  पुनर्विकासाची गरज निर्माण झाली होती. सभासदांनी एकत्रितपणे स्वयं पुनर्विकासाचा पर्याय निवडला . नवीन इमारतीचे उत्तम दर्जाचे बांधकाम  अक्षय तृतीयेपासून जोमाने  सुरू झाले. २८ सदनिका असलेल्या ७ मजल्यांची नवीन इमारत अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त असणार  आहे. फायबर ऑप्टिक तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल सेवा सर्व सदनिकांना पुरविल्या  जाणार आहेत. भविष्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक कारसाठी चार्जिंगची सेवा पुरवण्यात येणार आहे.

 पर्यावरणाचा विचार करून प्रतिष्ठित आय जी बी सी (IGBC) संस्थेकडून ग्रीन बिल्डिंग प्रमाणित होण्यासाठी ‘व्ही के :ई ‘ या कंपनीची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. प्रकल्प बांधकामाचा दर्जा व प्रकल्प पूर्ततेस लागणारा कालावधी या महत्त्वाच्या बाबींवर देखरेख ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘व्ही के :ए ‘ ग्रुपच्या ‘आय.पी.डी.एस.’ या बांधकाम क्षेत्रातील निष्णात कंपनीची प्रकल्प सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.  ‘इंटेलिजंट प्रोजेक्ट डिलिव्हरी सोल्युशन्स एलएलपी’ ही ‘व्ही.के:ए ‘  ग्रुपची संस्था असून ही संस्था गृहनिर्माण संस्थांना स्वयं पुनर्विकास प्रकल्पात सल्ला आणि निर्मिती सेवा पुरवते. हेमंती गृहरचना सहकारी संस्थेला ही त्यांनीच सल्ला सेवा पुरवली आहे.

उत्कृष्ट इमारत आराखडा, प्रकल्पात अद्ययावत सोयीसुविधा व परिसरातील मागणीनुसार सदनिका उपलब्ध करून दिल्याने संस्थेचा नूतन इमारत आराखडा ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. बांधकाम जोमात सुरू करत असताना सदनिका विक्रीस उदंड प्रतिसाद मिळाल्याने एकूण २८ पैकी ११  सदनिका बाहेरच्या ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध उपलब्ध झाल्या आहेत. हे सहकारी गृहरचना संस्थेसाठी पुण्यात प्रथमच घडत आहे.

हेमंती सहकारी गृहरचना उदाहरण अनुकरणीय :प्रसाद गायकवाड

यावेळी बोलताना नगररचना  खात्याचे उपसंचालक प्रसाद गायकवाड म्हणाले,’स्वयं पुनर्विकास हे सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील कोण्याही एकट्या दुकट्याचे काम नसते,तर सर्वांचे काम असते.एकी दाखवणे हा महत्वाचा टप्पा असतो.हेमंती गृहरचना संस्थेने एकजुटीने ते साध्य केले आहे.हे  उदाहरण अनुकरणीय ठरेल.याच धर्तीवर अन्य गृहनिर्माण संस्था पुढे आल्या तर येत्या काळात सहकारनगर हा परिसर स्वयं पुनर्विकासामुळे नियोजनपूर्वक चांगला विकसित होईल.नव्या युगात लागणाऱ्या सर्व सुविधा पुनर्विकासातून मिळतील’.

पुनर्विकासाच्या धोरणाची संपूर्ण  अंमलबजावणी व्हावी :सुहास पटवर्धन

पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन म्हणाले,’शासनालाही स्वयं पुनर्विकास अपेक्षित आहे.राज्य शासनाच्या  स्वयं पुनर्विकासाच्या धोरणाची संपूर्ण  अंमलबजावणी  झाली पाहिजे. सर्व अडथळे दूर झाले पाहिजेत.यासाठी आम्ही पाठपुरावा करू. एक खिडकी पद्धती,टीडीआर मध्ये सवलत  सुरु झाल्यास अजून गती येईल.सहकारी गृहनिर्माण संस्थांना कर्ज मिळण्याची प्रक्रिया देखील सुलभ होत आहे.रिझर्व्ह बँक आणि शासन त्यासाठी अनुकूल आहे. पुणे जिल्ह्यात १८ हजार गृहनिर्माण संस्था आहेत.त्यातील ३० टक्के इमारती पुनर्विकासासाठी प्रयत्नशील आहेत.  ज्येष्ठ आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी म्हणाले, ‘एकत्र राहून सहकारी तत्वावर काम केल्याने गृहरचना संस्थेच्या सभासदांचा जास्त फायदा होतो, हे या प्रकल्पातून दिसले आहे ‘. ज्येष्ठ नेते उल्हास(दादा ) पवार यांनीही मनोगत व्यक्त करून ‘हा मार्गदर्शक प्रकल्प चांगल्या पद्धतीने उभा राहावा.या प्रकल्पामुळे प्रत्येक सभासदाच्या घरात आणि मनात आनंद तेवत राहो’अशा  शुभेच्छा दिल्या.शौनक ताम्हणे यांनी सूत्रसंचालन केले.

*स्वयं पुनर्विकास तत्त्वावर इमारत पुनर्बाधणीचा प्रशस्त मार्ग* 

गेल्या ४ वर्षांत स्वयं पुनर्विकास तत्त्वावर इमारत पुनर्बाधणी करण्यासाठी विविध स्तरावर माहिती उपलब्ध झाल्याने तसेच आवश्यक निधीची तरतूद सहकारी बँकेतर्फे प्रकल्प कर्जाद्वारे सहज व सुलभतेने प्राप्त होणार असल्याने बऱ्याच गृहनिर्माण संस्थांना एक आशेचा किरण दिसायला लागले आहेत . राज्य सरकारकडून १९ सप्टेंबर २०१९ रोजी स्वयं पुनर्विकास करणाऱ्या गृहनिर्माण संस्थेसाठी मार्गदर्शक तत्त्वे व तरतुदी जाहीर झाल्या, सर्व सभासदांनी एकत्र येऊन दृढनिश्चय केल्यास एकजुटीने इमारत पुनर्बाधणी स्वयं पुनर्विकास तत्त्वावर करता येऊ शकते.संस्थेच्या सभासदांना सदनिका दिल्यानंतर उरलेल्या सदनिका स्वतःच विकून नफा मिळविणे संस्थेला शक्य होते. कारण स्वयं पुनर्विकास केल्याने या व्यवहारात बिल्डर(विकसक) नसतो.अतिरिक्त टीडीआर चा फायदा संस्थांना मिळतो.तसेच सर्व निर्मिती प्रक्रियेत सहभाग घेतल्याचा आनंद देखील गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांना मिळतो.स्वयं पुनर्विकास तत्त्वावर पुनर्बांधणी   होणारी ‘हेमंती’ ही पुण्यातील पहिली गृहरचना  संस्था ठरली आहे.