पुणे, २५ नोव्हेंबर २०२२: गृहनिर्माण क्षेत्रात कार्यरत अग्रगण्य ना-नफा संस्था हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाने बेंगळुरू (कर्नाटक), चेन्नई (तामिळनाडू), दिल्ली, पुणे (महाराष्ट्र), कांगपोकपी, चुराचंदपूर आणि तामेंगलाँग (मणिपूर) आणि पश्चिम बर्धमान (पश्चिम बंगाल) या जिल्ह्यांमधील ३५५ उपेक्षित कुटुंबांना सौरविजेद्वारे घरगुती प्रकाश प्रणालीद्वारे शाश्वत आणि अक्षय्य ऊर्जा उपाय प्रदान करण्यासाठी रॉकवेल ऑटोमेशनशी भागीदारीची घोषणा केली आहे.
सखोल गरजांचे मूल्यांकन आणि आधारभूत सर्वेक्षण केल्यानंतर, हॅबिटॅट इंडियाने बेंगळुरू, चेन्नई आणि दिल्ली येथे प्रत्येकी ५० कुटुंबे; पुण्यात ४० कुटुंबे; मणिपूरमध्ये १०० कुटुंबे आणि पश्चिम बंगालमध्ये ६५ कुटुंबे लाभार्थी म्हणून निश्चित केली आहेत. लाभार्थी कुटुंबांमध्ये रोजंदारीवर काम करणारे, विधवा, शारीरिक अपंगत्व असलेले लोक, इरुला जमातीचे लोक, संथाल जमाती, रोंगमेई जमाती आणि इतर अल्प उत्पन्न किंवा उपेक्षित समुदाय यांचा समावेश होतो. प्रत्येक सोलर होम लाइटिंग प्रणाली संचामध्ये चार्जिंग पॉईंट, पेडेस्टल फॅन, सोलर बॅटरी, चार्ज कंट्रोलर आणि एलईडी दिवे यांचा समावेश आहे.
या उपक्रमावर भाष्य करताना, हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजन सॅम्युअल म्हणाले, “हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाने आपल्या कामाच्या केंद्रस्थानी लोकांना ठेवण्यावर नेहमीच विश्वास राखला असून, चांगली स्वच्छता, पाण्याची उपलब्धता असलेल्या नीटनेटक्या घरांसाठी आवश्यक ते पाठबळ देऊन, आरोग्यदायी गृहनिर्माण परिसंस्था तयार करण्याला हातभार लावला आहे. तसेच घराला घरपण देण्यासाठी आवश्यक इतर घरगुती आणि सामुदायिक स्तरावरील पायाभूत सुविधांच्या विकसनावरही तिचा भर राहिला आहे. सौरऊर्जेचा वापर केल्यास या ३५५ कुटुंबांच्या राहणीमानात सुधारणा होईल. कुटुंबातील सदस्य दिवसा बाहेर त्यांची घरगुती कामे करू शकतात आणि मुले रात्रीही अभ्यास करू शकतात. या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी केल्याबद्दल आम्ही रॉकवेल ऑटोमेशनचे आभार मानतो.”
सौरऊर्जा उपकरणांच्या वितरणाव्यतिरिक्त, या कुटुंबांना त्याच्या हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाद्वारे सेल्को फाऊंडेशन या भागीदाराच्या सहयोगाने या उपकरणांचा वापर आणि देखरेखीच्या दृष्टीने माहिती, प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे.