हिमालयातील साहसी पदभ्रमंतीसाठी ‘युवाशक्ती’कडून १५५ पुणेकर रवाना

29
पुणे : हिमालय पर्वतरांगेतील मनालीमधील ‘देवतीब्बा’, धरमशालामधील ‘त्रिवुंड-लाका ग्लेशीयर’ आणि गढवालमधील ‘हर की दून’ अशा विविध ठिकाणी साहसी पदभ्रमंतीसाठी (ट्रेक) १५५ पुणेकर आज गुरुवारी दिल्लीकडे रवाना झाले. पदभ्रमणातील अग्रणी ‘युवाशक्ती’ संस्थेच्या वतीने विविध वयोगटातील १५५ ट्रेकर्सने हिमालयाकडे आगेकूच केली.
नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे रेल्वे स्टेशन येथे या उत्साही ट्रेकर्सना भेटून शुभेच्छा दिल्या. कुठल्याही प्रकारच्या व्यसनांच्या आहारी न जाता पदभ्रमंतीचा व्यासंग जपल्याबद्दल धंगेकर यांनी ट्रेकर्सचे अभिनंदन केले. यावेळी युवाशक्ती संस्थेचे अध्यक्ष डॉ. अजित साने यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. अजित साने म्हणाले, “महाराष्ट्राच्या, प्रामुख्याने पुण्याच्या तरुणाईला निसर्गात भटकंती करण्याचा वारसा पूर्वीपासूनच आहे. कोरोनामुळे गेल्या दोन-तीन वर्षात ट्रेकिंगला काहीशी मरगळ आली होती. मात्र, पुन्हा एकदा तरुणाईची पावले निसर्गाच्या सान्निध्यात वळत आहेत. हिमालयातील साहसी पदभ्रमंती तरुणाईची पसंती आहे. मे आणि जून या पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत अशा अनेकविध ट्रेकचे आयोजन होणार आहे.”