हिंदूंवरील आघात रोखण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’ !
हिंदु राष्ट्र-जागृती सभा ! यातील ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दाबाबत आज भारतभरात चर्चा होत आहे. अनेक सेक्युलरवादी त्यावर टीकाही करत आहेत. भारतातीलच नव्हे, तर पाकिस्तानातील सरकारलाही भारत हिंदु राष्ट्र बनण्याच्या दिशेने जात असल्याची स्वप्ने पडू लागली आहेत. काय आहे ‘हिंदु राष्ट्र’ ? ते का हवे आहे? आज हिंदु धर्मावर आलेल्या आणि येऊ शकणार्या संकटांबाबत बहुतांश हिंदू अनभिज्ञ आहेत. ख्रिस्त्यांकडून मोठ्या प्रमाणात हिंदूंचे सुरू असलेले धर्मांतर, मुसलमानबहुल भागात होत असलेले हिंदूंचे खच्चीकरण, लव्ह जिहाद, काश्मीरमधील हिंदूंवर इस्लामी दहशतवाद्यांनी केलेले अनन्वित अत्याचार, हिंदूंच्या हत्या, हिंदूंविरोधी कायदे, हिंदूंनी श्रद्धेपोटी अर्पण केलेला मंदिरांतील पैसा हडप करण्याच्या उद्देशाने सरकारने केलेले मंदिरांचे सरकारीकरण, ही काही हिंदु धर्मावरील संकटांची उदाहरणे झाली. या संकटांचा सामना करण्यासाठी हिंदूंची तयारी व्हावी यासाठी ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ आयोजित करण्यात येत आहेत. वर्ष 2007 ते वर्ष 2022 च्या नोव्हेंबरपर्यंत 2 हजार 13 हून अधिक ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ झाल्या असून त्याला 20 लाख 36 हजारांहून अधिक हिंदू उपस्थित होते. या सभा मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, तेलगू, मल्याळम्, बंगाली आदी विविध भारतीय भाषांमध्ये देशभरात घेतल्या जात आहेत.
‘हिंदु’ या शब्दाची व्याख्या आपल्या ‘मेरुतंत्र’ या धर्मग्रंथात दिली आहे. ‘हीनं दूषयति इति हिन्दुः ।’ म्हणजे ‘हीन किंवा कनिष्ठ अशा रज आणि तम गुणांचा ‘दूषयति’ म्हणजेच नाश करणारा, म्हणजेच सात्त्विक असणारा तो हिंदु !’ म्हणजे जो जो स्वतःतील वाईट गोष्टी नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतो, तो तो हिंदु आहे ! आपल्यासाठी धर्म आणि राष्ट्र वेगळे नाहीत. आमचे धर्मपुरुष हे सारे राष्ट्रपुरुष आहेत आणि राष्ट्रपुरुषही धर्म पाळणारे आहेत. आम्ही देवतांचे चरण धुतांनासुद्धा ‘या राष्ट्राला बळ प्राप्त होवो’, असा मंत्र म्हणतो. मंत्रपुष्पांजलीमध्येही ‘समुद्रवलयांकित पृथ्वी एक राष्ट्र होवो’, ही प्रार्थना करतो. धर्माचे सारे मंत्र राष्ट्रकल्याणाचेच नव्हे, तर विश्वकल्याणाचे आहेत. त्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेमुळे राष्ट्रकल्याण आणि विश्वकल्याण हे होणारच आहे.
असे असतांनाही आज जगभरात ‘हिंदु असहिष्णु आहेत’, ‘हिंदु हिंसक आहेत’, ‘हिंदु असंवेदनशील आहेत’, असे षड्यंत्रपूर्वक वातावरण निर्माण केले जात आहे ! कुठेतरी गोतस्करी करणार्या एखाद्या कसायाला पकडून कोणीतरी चोप दिला की, लगेच ‘मॉब लिंचिंग’च्या नावाने हिंदूंच्या विरोधात टाहो फोडला जातो; पण गोहत्या रोखण्यासाठी सनदशीर मार्गाने प्रयत्न करूनही, पोलिसांचे साहाय्य न मिळूनही कसायांची गाडी रोखण्याचा प्रयत्न करतांना वेळप्रसंगी कसायांची आक्रमणे झेलतो; अनेकदा जीवही गमावतो; मात्र त्या गोरक्षक हिंदूची साधी बातमीही कुठे येत नाही. मुसलमानांना भारत ‘दार-उल-इस्लाम’ म्हणजे इस्लाममय करायचा आहे, तर कम्युनिस्टांना भारतात ‘नास्तिकतावाद’ आणायचा आहे, यासाठी ते जगात हिंदु धर्माची बदनामी करत आहेत. हा हिंदुविरोधी प्रचार हिंदूंना गुन्हेगार ठरवत आहे. ही स्थिती पालटून न्यायाचे राज्य आणण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे आहे.
भारताच्या संविधानात प्रस्तावनेत प्रत्येक नागरिकाला समता, बंधुता आणि न्याय मिळेल, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात आपल्या देशात अल्पसंख्य आयोग, सच्चर आयोग, अल्पसंख्यांक विकास मंत्रालय आहे; मात्र बहुसंख्य हिंदूंना कोणतेही संरक्षण देणारे मंत्रालय-आयोग नाही. मुसलमान आणि ख्रिस्ती यांना धार्मिक शिक्षण देणार्या शाळांना सरकारी अनुदान आणि हिंदूंना भगवत्गीतेसह धार्मिक शिक्षण देण्यावरच आक्षेप आहे ! लोकसंख्या नियंत्रणासाठी हिंदूंना सक्ती, मात्र अल्पसंख्याकांना मोकळीक का ? देशभरात केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण, तर मशिदी-चर्चचे सरकारीकरण का नाही ? अल्पसंख्याकांना धर्माच्या आधारावर शैक्षणिक अनुदान, मग बहुसंख्य हिंदूंनी काय अपराध केला आहे ? हा दुजाभाव का ? हे सर्व पहाता भारतात खरोखरच ‘सेक्युलर’ व्यवस्था अस्तित्वात आहे का ? कि केवळ अल्पसंख्याकांच्या हितासाठी आणि हिंदु धर्मियांवर अन्याय करण्यासाठी ती राबवली जात आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे आहे.
देशाची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत असतांनाही शासन हिंदूंना ‘हम दो हमारे दो’ असे संततीविषयक निर्बंध घालते; मात्र अन्य पंथियांना त्याविषयी कोणतीही सक्ती करत नाही. परिणामी भारतातील हिंदूंची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे. वर्ष 1951 मध्ये हिंदूंची लोकसंख्या 84.1 टक्के होती, ती वर्ष 2011 मध्ये घटून 79.8 टक्क्यावर आली आहे. बिहारमध्ये ‘पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पी.एफ्.आय.च्या) कार्यकर्त्यांना पकडल्यावर ‘वर्ष 2047 मध्ये भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठी 10 टक्के मुसलमानांनी साहाय्य केले, तर दुबळ्या बहुसंख्यांकांना (हिंदूंना) गुडघ्यावर टेकवून इस्लाम स्वीकारण्यास बाध्य करू’, असे त्यांच्या कागदपत्रांमध्ये लिहिलेले आहे. याकडे हिंदूंनी डोळेझाक करू नये. याच वृत्तीमुळे भारताचाच एकेकाळी भाग असणारा अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका आपण गमावले आहेत. हे असेच चालू राहिले तर उद्या राष्ट्रच उरणार नाही. आज जगात 157 हून अधिक ख्रिस्ती देश आहेत, 52 हून अधिक इस्लामी देश आहेत, 12 बौद्ध देश आहेत, केवळ 84 लक्ष लोकसंख्या असलेल्या ज्यूंचाही एक स्वतंत्र देश आहे; मात्र 100 कोटी हिंदूंचे एकही स्वतंत्र राष्ट्र नाही. यासाठी हिंदूंचे स्वत:चे एक राष्ट्र तरी हवे आहे.
देशात मुसलमान समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी सच्चर आयोगाची नेमणूक करण्यात आली अन् त्यानुसार मुसलमान समाजाच्या प्रगतीसाठी अनेक प्रकारची अनुदाने देण्यास या ‘सेक्युलर’ शासनाने प्रारंभ केला. हिंदूंमध्ये आर्थिक दुर्बल घटक नाहीत का ? मग केवळ एका विशिष्ट समाजालाच असे अनुदान का ? हिंदूंनी कर भरून देशाला पैसा द्यायचा आणि सरकारने तो केवळ अल्पसंख्य म्हणून अन्य पंथीयांना वाटायचा ! हीच मानसिकता बदलण्यासाठी आम्हाला हिंदु राष्ट्र हवे आहे.
देशातील विविध राज्यांतील ‘सेक्युलर’ सरकारे आणि प्रशासन प्रतिवर्षी सरकारी निधीतून ‘इफ्तार पार्ट्या’ आयोजित करतात; मात्र हिंदूंच्या दिवाळी-दसरा आदी कोणत्याही सणांसाठी अशी सरकारी खर्चाने ‘पार्टी’ दिली गेल्याचे ऐकिवात नाही. भारतीय राज्यघटनेने नागरिकांना सुरक्षिततेचे अभिवचन देऊनही 33 वर्षे होत आली, पण काश्मिरी हिंदूंचे त्यांच्या मातृभूमीत पुनर्वसन होऊ शकलेले नाही. कलम 370 हटवले; मात्र काश्मीर अजूनही आतंकवादमुक्त झालेला नाही.
पूर्वी मांसापुरते मर्यादित असणारा हलाल आता भारतातील साखर, तेल, आटा, चॉकलेट, मिठाई, सौंदर्यप्रसाधने, औषधे आदी विविध उत्पादनेही ‘हलाल सर्टिफाइड’ होऊ लागली आहेत. मुळात भारत सरकारच्या अधिकृत ‘FSSAI’ आणि ‘FDA’ या संस्था उत्पादनांचे प्रमाणिकरण करत असतांना वेगळ्या ‘हलाल प्रमाणिकरणा’ची गरजच काय ? आज मॅकडोनल्ड्स, केएफ्सी, बर्गरकिंग, पिझ्झा हट यांसारख्या नामवंत कंपन्या हिंदू, जैन, शीख अशा गैर-मुस्लिम समाजाला सर्रास ‘हलाल’ खाद्यपदार्थ विकत आहेत. भारतातील 15 टक्के मुसलमान समाजासाठी 80 टक्के हिंदु समाजावर हलाल उत्पादनांची सक्ती आम्ही खपवून घेणार नाही. भारताला धर्मनिरपेक्ष म्हणायचे आणि धर्माच्या आधारावर उत्पादनांच्या इस्लामी प्रमाणिकरणाचा घाट घालायचा, हा काय प्रकार आहे ?
लाखो हिंदु मुलींचे जीवन उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद म्हणजे ‘लव्ह जिहाद’ ! काही पंथ हिंदूंच्या जीवावरच उठलेत. जगभरात ‘जिहाद’च्या नावाने उच्छाद मांडला आहे; तसा भारतातही विविध माध्यमातून जिहाद चालू आहे. प्रामुख्याने ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’ ‘हलाल जिहाद’ ! श्रद्धा वालकर, निधी गुप्ता, निकिती तोमर, अंकिता सिंह, तारा सहदेव आदी अनेक हिंदू तरुणी ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत. देशभरात दिवसेंदिवस ‘लव्ह जिहाद’च्या समस्या गंभीर रूप धारण करत आहे. हिंदूंवरील अन्यायाची अशी कितीही उदाहरणे दिली, तरी न संपणारीच आहेत. ‘सेक्युलर’वादाच्या नावाखाली देशात अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन आणि बहुसंख्यांक हिंदु समाजावर अन्याय होत राहिला आहे. अशी अन्याय्य व्यवस्था पालटण्ो आणि देशातील संपूर्ण समाजाला समानतेची वागणूक देणारे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याची आज आवश्यकता निर्माण झाली आहे.
भारतात प्राचीन काळात गणराज्य अस्तित्त्वात असतांना दोन राज्यांत युद्ध होत होती, तरी कोणीही कोणावर कधी त्यांची पूजापद्धत स्वीकारण्याची बळजोरी केली नाही. तसेच ‘केवळ हीच पूजापद्धत योग्य आहे’, असे मानण्याची सक्तीही केली नाही. सर्वच मार्ग ईश्वराकडे जातात, या उदात्त संकल्पनेला हिंदु धर्माने जगापुढे मांडले आहे. त्यामुळेच जगभरातील इस्लामी आक्रमणांमुळे भारतात निर्वासित बनून आलेल्या पारशी, तसेच ज्यू समाजाला गेल्या दीड हजार वर्षांत कोणत्याही प्रकारची अयोग्य वागणूक हिंदु समाजाने दिली नाही. याचबरोबर ते अल्पसंख्य आहेत, म्हणून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय हिंदु समाजाने कधी केला नाही. त्यामुळे आज भारतातील सर्वांत मोठ्या उद्योगपतींत पारशी समाजातील ‘टाटा-गोदरेज’ यांचा समावेश होतो. त्यामुळे ‘हिंदु राष्ट्र’ आल्यास अल्पसंख्यांक आणि मुसलमान यांचे काय होणार, ही भीती अनाठायी आहे !
हिंदु राष्ट्र हा शब्द उच्चारला, तरी काही पत्रकार, सेक्युलरवादी, अन्य पंथीय, काँग्रेसवाले इत्यादी मंडळी ‘हिंदु राष्ट्राची मागणी घटनाबाह्य आहे’, असे म्हणतात; पण त्यांना प्रश्न आहे की, मूळ राज्यघटनेत ‘सेक्युलर’ असा उल्लेख कोठेही नव्हता. इंदिरा गांधींनी 1976 मध्ये 42 वी घटनादुरुस्ती करून ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ हे शब्द राज्यघटनेत घुसडले. याचा अर्थ 1976 पूर्वी ‘हे राष्ट्र सेक्युलर करू’, अशी घोषणा करणे घटनाबाह्य नव्हते; मग ‘हिंदु राष्ट्रा’ची घोषणा ही घटनाबाह्य कशी होईल ? आतापर्यंत 100 हून अधिक वेळा घटनादुरुस्ती करण्यात आली आहे. घटनादुरुस्तीद्वारे जर ‘निधर्मी’ राष्ट्र बनवता येते, तर मग ‘हिंदु राष्ट्र’ का होऊ शकत नाही ? कायद्याच्या चौकटीत राहून कोणतेही परिवर्तन करण्यास घटना स्वातंत्र्य देते. छत्रपती शिवरायांचे ‘हिंदवी स्वराज्य’ आदर्श होते, रयतेचे राज्य होते, न्याय करणारे राज्य होते, माय-भगिनींचे रक्षण करणारे राज्य होते ! त्याच हिंदवी स्वराज्या’चा आदर्श ठेवून त्यासम ‘हिंदु राष्ट्र’ भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहोत.
जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् !
संकलन : श्री. पराग गोखले , हिंदु जनजागृती समिती
संपर्क : 8983335517
अधिक माहितीसाठी !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’
स्थळ : कै. मारुतराव काळे प्राथमिक विद्यालयाचे मैदान,प्रगती शाळेजवळ,काळेपडळ,हडपसर,पुणे
दिनांक : 1 जानेवारी 2023,वेळ : सायं 6 वाजता