हिंदू जनजागृती समितीचा सामाजिक उपक्रम

77
हिंदू जनजागृती समितीच्या वतीने शालेय विद्यार्थिनींसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटप उपक्रमाचे यशस्वी आयोजन !
    पुणे 20 जानेवारी – हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सामाजिक जाणीव जोपासली जावी आणि समाजाला त्याचा अधिकाधिक लाभ व्हावा या उद्देश्याने आरोग्य तपासणी,मंदीर स्वच्छता,गरजूंना अन्नदान,शालेय साहित्य वाटप अश्या प्रकारचे विविध उपक्रम नियमितपणे घेतले जातात. याचाच एक भाग म्हणून 19 जानेवारी या दिवशी मुलींचे आगरकर हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय, सोमवार पेठ पुणे या शाळेत ‘मुलींचे आरोग्य कसे सांभाळावे’ या विषयी डॉ. सौ. मुक्ता लोटलीकर यांनी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा लाभ 105 विद्यार्थिनींनी घेतला. यामध्ये मुलींनी आरोग्याची काळजी कशी घ्यायची, तसेच आहार आणि व्यायाम याचेही महत्त्व सांगितले. तसेच मुलींच्या प्रश्नांना डॉ. मुक्ता लोटलीकर यांनी समर्पक उत्तरेही दिली. शाळेच्या शिक्षिका सौ. सुनीता लोणकर यांनी उपक्रमास साहाय्य केले. श्री. जाधव आणि सौ. वैशाली गुजर यांनी आयोजनात सहभाग घेतला आणि उपक्रम यशस्वी केला.
      तसेच सरदार लक्ष्मीबाई रास्ते प्राथमिक शाळा, रास्ता पेठ येथे 18 जानेवारी या दिवशी बालवाडी ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने खाऊ वाटप उपक्रम झाला. याचा लाभ मुलांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अशा एकूण 120 जणांनी घेतला. बऱ्याच विद्यार्थी विद्यार्थिनींनी तसेच शिक्षकांनीही उपक्रम छान झाल्याचे सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलभा मोहन चाबुकस्वार यांनीही उपक्रम छान झाला असे सांगितले तसेच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शाळेत नैतिक मूल्य किंवा संस्कार वर्ग घ्यावे असेही आग्रहाने सांगितले आहे.