हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसारासाठी हडपसर येथे वाहनफेरी !

109

‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’च्या उद्घोषाने हडपसर परिसर दुमदुमला !

   हडपसर (पुणे) – येथे आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसारासाठी काढण्यात आलेली भव्य वाहनफेरी उत्साहात पार पडली. दुचाकींवरील भगवे ध्वज, पारंपरिक वेशातील हिंदुत्वनिष्ठ, हिंदू ऐक्य आणि हिंदुत्वाचा अभिमान जागृत करणार्‍या घोषणा, तसेच चौकाचौकांमध्ये  फेरीचे झालेले स्वागत आणि  पुष्पवृष्टी यांमुळे संपूर्ण वातावरण हिंदुत्वमय झालेले दिसत होते.

8 जानेवारी 2023 या दिवशी सायंकाळी 6.00 वाजता कै. मारुतराव काळे प्राथमिक विद्यालयाचे मैदान, काळेबोराटेनगर (काळेपडळ), हडपसर येथील मैदानात हिंदु राष्ट्र-जागृती सभा होणार आहे. सनातन संस्थेचे धर्मप्रसारक सद्गुरु नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट,रणरागिणी शाखेच्या सौ.भक्ती डाफळे हे सभेला संबोधित करणार आहेत.

   प्रारंभी शंखनाद करण्यात आला त्यानंतर श्री. पप्पाजी पुराणिक मा. संस्थापक अध्यक्ष, ओम जयशंकर प्रतिष्ठान पुणे,अध्यक्ष ब्रह्म महाशिखर परिषद (भारत) आणि ह भ प दत्तात्रय तुकाराम चोरघे,अखिल भारतीय वारकरी मंडळ सदस्य आणि चिंतामणी प्रासादिक दिंडी ( देहू ते पंढरपूर – तुकोबाराय दिंडी, ३० नंबर ची दिंडी) खजिनदार यांचे हस्ते धर्मध्वजाचे पूजन करून येथील पुरोहित स्वीट्स पासून दुपारी 4.30 ला फेरी प्रारंभ झाली. ससाणेनगर – काळेबोराटे नगर रस्ता – जनसेवा बँक कॉलनी – तुकाई टेकडी चौक मार्गाने निघालेल्या फेरीचा समारोप कै. मारुतराव काळे शाळेचे मैदान, काळेपडळ, हडपसर, पुणे येथे सांगता सभेने झाला. हिंदु जनजागृती समितीचे श्री.पराग गोखले आणि रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला बहुसंख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन केले.

  वाहन फेरीमध्ये बहुसंख्येने धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ  दुचाकी वरून सहभागी झाले होते. महिलांची संख्या लक्षणीय प्रमाणत होती.क्रांतिकारकांच्या वेशातील लहान मुलांचा सहभाग  सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.