हिंजवडीत जुगार अड्ड्यावर छापा, 24 जणांवर गुन्हा दाखल

341

पिंपरी (सुचिता भोसले) : सावकार चौक, मारूंजी येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाने रविवारी छापा घातला. यामध्ये जागा मालकासह जुगार खेळणाऱ्या 24 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी एक लाख 33 हजार 760 रुपयांचा ऐवज हस्तगत केला.

अविनाश बुचडे (वय 27, रा. मारूंजी) याच्यासह 24 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षा पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मारूंजी येथील सावकार चौकात असलेल्या पाण्याच्या टाकीजवळील पत्र्याच्या शेडमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागास मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला. यावेळी खेळत असलेल्या 23 जणांवर पोलिसांनी कारवाई करीत गुन्हा दाखल केला. तसेच जागेचा मालक अविनाश बुचडे यांच्यावरही गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी या जुगार अड्ड्यावरून एक लाख 28 हजार 760 रुपयांची रोकड, पाच हजार रुपयांचे जुगाराचे साहित्य, एक मोबाइल फोन असा एकूण एक लाख 33 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.