सुराज्य अभियानाचे अंतर्गत म.रा.परिवहन पुणे विभागीय नियंत्रक यांना निवेदन सादर !
पुणे – हिंदू जनजागृती समिती समाज सहाय्य आणि राष्ट्र रक्षण, धर्मजागृतीचे कार्य गेल्या पंधरा वर्षापासून करत आहेत. समाजकल्याणकारी उपक्रम म्हणून सुराज्य अभियान ठिकठिकाणी राबविले जाते. या अंतर्गत स्वारगेट बस स्थानक येथे असलेल्या दुरावस्थेची छायाचित्रे आणि त्या संदर्भातील निवेदन येथील विभागीय नियंत्रक श्री.रमाकांत गायकवाड यांना दिले. पुण्याचे पालकमंत्री आणि कोथरूड विधानसभा आमदार मा. श्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले.
बसस्थानकाची स्वच्छता त्वरित करावी आणि प्रवाशांना किमान प्राथमिक सुविधा तरी द्याव्यात, अशी मागणी सुराज्य अभियान अंतर्गत निवेदनाद्वारे करण्यात आली. या प्रसंगी सुराज्य अभियानाचे श्री. पराग गोखले, श्री कृष्णाजी पाटील, आशा फौंडेशनचे श्री.पुरुषोत्तम डांगी आदी उपस्थित होते. या वेळी श्री.रमाकांत गायकवाड यांनी ‘निवेदनात दिल्याप्रमाणे सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करू’, असे सांगितले.
75 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त एस्.टी. महामंडळाने वर्ष 2023 हे अमृत महोत्सवी वर्ष घोषित केले असून त्यानिमित्त ‘बसस्थानक स्वच्छता मोहीम घोषित केली आहे. मात्र मोहीम चालू होऊन 4 महिने झाल्यानंतरही राज्यातील मुख्य बसस्थानकांची स्थिती अत्यंत विदारक आहे. मोहीम घोषित करून प्रत्यक्षात मात्र बसस्थानके किती अस्वच्छ आहेत, हे लक्षात आणून देण्यासाठी सुराज्य अभियान उपक्रम अंतर्गत हे निवेदन देण्यात आले.
अशी आहे पुणे येथील स्वारगेट बसस्थानकाची दुरावस्था !
बसस्थानकाच्या शेडमध्ये दिवसाढवळ्या मद्य पिणारे मद्यपी बसलेले असतात त्यांचा त्रास अन्य प्रवासी तसेच महिलांना सहन करावा लागतो. तसेच बसस्थानकामधील प्रवासी थांबलेले असताना त्यांना स्वत:च्या वाहनांमध्ये नेणारे खासगी वाहतुकदारही तिथे कायम उभे असलेले दिसतात. बसस्थानकावर प्रवाशांना बसण्यासाठी असलेले बाकडे मोडली आहेत; परंतु अनेक मासांपासून ते त्याच स्थितीत आहेत. ही बाकडी दुरुस्त करण्यात आलेली नाहीत.
बसस्थानकाच्या परिसरात उघड्यावर टाकलेला कचरा आणि तेथे विनावापराच्या पडून असलेल्या वातानुकूलित गाड्या, बुरशीमुळे काळेकुट्ट झालेले छत आणि भिंती तसेच परिसरात इतरत्र टाकलेला कचरा तसेच परिसरात पडलेला पालापाचोळा यामुळे स्वारगेट बसस्थानकाची दुरावस्था झाली आहे.
बसस्थानकाच्या स्वच्छतेसह प्रवाशांना किमान प्राथमिक सुविधा तरी चांगल्या प्रकारे दिल्यास अधिकाधिक प्रवासी एस्.टी. कडे आकर्षित होतील. याविषयीचे गांभीर्य लक्षात घेऊन बसस्थानकाची स्वच्छता लवकरात लवकर करण्यात यावी, तसेच केवळ मोहिमेपुरती नव्हे, तर बसस्थानके कायमस्वरूपी स्वच्छ रहाण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना आखण्यात यावी, असे आवाहन सुराज्य अभियानाच्या वतीने एस्.टी. प्रशासन आणि राज्य सरकार यांना करण्यात आले आहे.