पुणे : सांगवी एफसी, नॉईझी बॉईज आणि अखिल भुसारी कॉलनी (एबीसी) संघांनी द्वितीय-तृतीय श्रेणीतील अॅस्पायर चषक २०२३ फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. यामध्ये सांगवी, नॉईझी संघांचा विजय सहज होता, तर एबीसी संघाला विजयासाठी संघर्ष करावा लागला.
पिंपरी येथील डॉ. हेडगेवार मैदानावर हे सामने सुरु आहेत. पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचीही या स्पर्धेला मान्यता आहे.
पहिल्या सामन्यात अखिल भुसारी कॉलनी संघाने बीटा स्पोर्ट्स क्लबचा १-० असा पराभव केला. सामन्यातील एकमात्र गोल यश पवारने १५व्या मिनिटाला नोंदविला. यानंतर दोघांनाही गोल करण्याच्या विशेष संधी निर्माण करता आल्या नाहीत. या एकमात्र गोलच्याच जोरावर एबीसीने विजय मिळवून उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
सांगवी एफसीने ब्लॅकहॉक्स संघाचा ४-० असा धु्व्वा उडवला. या सामन्यात प्रसन्ना गायकवाडने हॅटट्रिक नोंदवताना विजयात महत्वपूर्ण योगदान दिले. प्रसन्नाने १६ आणि २०व्या मिनिटाला गोल केल्यावर उत्तरार्धात ४०व्या मिनिटाला तिसरा गोल कला. त्यापूर्वी ३०व्या मिनिटाला गोल करून निखिल शिंदेने संघाची आघाडी भक्कम केली होती.
अन्य एका सामन्यात नॉईझ बॉईज संघाने पहिल्या सत्रातच नोंदवलेल्या २ गोलच्या आघाडीवर कॉन्सियंट फुटबॉल संघावर विजय मिळविला. अक्षय दगडेने १०व्या, तर अयोज कुटेने १९व्या मिनिटाला गोल करून संघाची आघाडी भक्कम केली.
चौथ्या सामन्यात पुणे पॉयोनिर्सला गोल्फा अकादमीकडून पुढे चाल मिळाली.
निकाल –
द्वितीय-तृतीय श्रेणी – अखिल भुसारी कॉलनी १ (यश पवार १५वे मिनिट) वि.वि. बीटा स्पोर्टस क्लब ०
सांगवी एफसी ‘ब’ ४ (प्रसन्न गायकवाड १६, २०, ४०वे मिनिट, निखिल शिंदे ३०वे मिनिट) वि.वि. ब्लॅक हॉक्स एफसी ०
नॉईझी बॉईज २ (अक्षय दगडे १०वे मिनिट, अयोज कुटे १९वे मिनिट) वि.वि. कॉन्सियंट फुटबॉल ०