मुंबई | सध्या कोरोनासारख्या महामारीशी लढताना तमाम जनतेबरोबरच राज्यसरकारच्याही नाकी नऊ आले आहेत. अशा परिस्थितीत लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय घेण्यात आल्याने इतर उद्योगधंद्यांबरोबर नाभिक समाजावर देखील उपासमारीची वेळ आली आहे. हि परिस्थिती निवारण्यासाठी राज्य सरकार शक्य तितके प्रयत्न करतच आहे. अशा कठीण प्रसंगी नाभिक समाजाने सरकार विरोधात मोर्चे, उपोषणे, आंदोलन करताना कोरोना महामारी संदर्भात घालून दिलेले नियम पाळून व संयम ठेवून सरकारपुढे आपल्या मागण्या मांडाव्यात, असे आवाहन केशकर्तनकार बंधू चव्हाण यांनी सर्व नाभिक समाज बांधवांना केले आहे.
कोरोना काळात दुकाने बंद राहिल्याने आतापर्यंत 28 नाभिक बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत. पुन्हा एकदा नाभिक समाजात आत्महत्यांचे प्रमाण वाढणार की काय या भीतीने समाजातील संस्था मोर्चा, आंदोलन करत आहेत. आता तर आमरण उपोषण करण्याची भाषा करत आहेत. परंतु हे करत असताना त्यांनी कोरोना संदर्भातले नियम पाळले पाहिजेत. मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सींगचे पालन केले पाहिजे. कारण आपल्यामागे आपला परिवारसुद्धा आहे. त्यांची काळजी आपणच घेतली पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे हे कोरोना परिस्थिती उत्तमप्रकारे हाताळत आहेत. परंतु यावेळेस कोरोनाची दुसरी लाट खरोखरच भयंकर असून आरोग्य व्यवस्थेच्या तुलनेत रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. ऑक्सिजन व आरोग्य कर्मचार्यांअभावी रुग्ण मृत्यूमुखी पडत आहेत. तरीही वैद्यकीय अधिकारी कुठेच कमी पडत नाही आहेत. ते त्यांच्या पद्धतीने कष्ट घेतच आहेत. योग्यवेळी योग्य उपचारांनी कोरोना बरा होतो हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.
सरकारने लॉकडाऊन काळात सलून व्यावसायिकांबाबतीत नियम शिथिल करुन सलून सुरू करण्यास परवानगी द्यावी, हवे तर त्यांना वेळ ठरवून द्यावी तसेच त्यांना आरोग्यविषयक नियम घालून द्यावेत, जे सलून व्यावसायिक हे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करावीे इ. प्रश्नांसंदर्भात बंधू चव्हाण हे स्वतः मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांना भेटणार असून त्यातून एखादी चांगली बातमी कळेल व ज्या ज्या वेळी मदत लागेल त्या त्या वेळी ते समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. थोडा धीर धरा, हेही दिवस निघून जातील व पुन्हा चांगले दिवस येतील असेही त्यांनी सांगितले.
चौकट : वास्तव परिस्थितीची जाणीव ठेवून व भविष्याचा विचार करून कोणीही चुकीचे पाऊल उचलू नका. संक्रमण रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सलून व्यावसायिकांच्या प्रश्नांसंदर्भात सरकारशी सकारात्मक बोलणे चालले आहे. त्यातून लवकरच चांगला तोडगा निघेल अशी आशा आहे….
उदय टक्के (सलून ब्युटीपार्लर असोसिएशन सल्लागार व महाराष्ट्र प्रभारी)