पुणे – ‘सनातन संस्था’ ही ऋषीमुनी आणि संत-महंत यांनी धर्मशास्त्र हा आधारस्तंभ मानून समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उन्नतीचा जो मार्ग दाखवला, त्यानुसार कार्य करणारी अग्रणी संस्था आहे. सनातन संस्थेने ‘समाजाचा सर्वांगीण उत्कर्ष साधता यावा’ यासाठी अनेक ग्रंथ निर्मित केले आहेत. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमांतून आध्यात्मिक ज्ञानदानाची सेवा व्हावी, या उद्देशाने ३ एप्रिल या दिवशी रेणुका स्वरूप मुलींच्या शाळेत सनातन संस्थेच्या वतीने मोठे आणि लघु असे ३४ ग्रंथ भेट देण्यात आले. रेणुका स्वरूप (मुलींची) शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका पूजा जोग, पर्यवेक्षिका शर्मिला जोशी, ग्रंथपाल अनघा करंदीकर यांनी हे ग्रंथ स्वीकारले. ‘ अभ्यास कसा करावा, सुसंस्कार अन् चांगल्या सवयी, गुण जोपासा अन् आदर्श व्हा’, तसेच प्रथमोपचार विषयक, आयुर्वेद विषयक ग्रंथ भेट देण्यात आले. या ग्रंथांच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांना ‘अभ्यासाला अध्यात्माची जोड कशी द्यावी, तसेच व्यक्तिमत्त्व विकास कसा करावा’ याविषयी लाभ होऊन आनंदी आणि ताणविरहित जीवन जगणे सुलभ होईल. या वेळी मुख्यध्यापिका पूजा जोग आणि ग्रंथपाल शर्मिला जोशी यांनी ‘ग्रंथ खूप छान आहेत आणि वेगळे आहेत. मुलींना याचा लाभ होईल’ असा प्रतिसाद दिला.