पुणे, ता. ०९, डिसेंबर २०२२: “वेगवेगळ्या भीतीने आपल्या सर्वांना ग्रासले आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी मानसिक शांतता, स्थिरता आणि श्वाासावर लक्ष केंद्रीय करणे ही त्रिसूत्री आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी ‘स्वास्थम्’ हा उपक्रम उपयुक्त ठरेल,” असा विश्वास मुंबई येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी येथे शुक्रवारी केले.
‘सकाळ’तर्फे आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या ’स्वास्थम’ या उपक्रमाची सुरवात आजपासून झाली. या अंतर्गत ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्रीज’ (एमसीसीआयए) सहकार्याने ‘पर्सपेक्टिव अबाउट वेलनेस ऑफ एम्प्लॉयीस अँण्ड देअर फॅमिलीज’ या कार्यक्रमात डॉ. बर्वे बोलत होते. शहरातील नामांकित कंपन्यांचे मनुष्यबळ विकास विभागातील अधिकारी यात सहभागी झाले.
डॉ. बर्वे म्हणाले, “कोरोना उद्रेकात प्रत्येक श्वास घेताना भीती होती. कोणत्या श्वासातून कोरोनाचा विषाणू शरीरात जाईल, हा मानसिक ताण सर्वांवर होता. त्यातून भीतीची मानसिकता निर्माण झाली. कोरोनामध्ये फक्त शारीरिक नाही तर, मानसिक आरोग्याचा गंभीर प्रश्न पुढे आला. कोरोना उद्रेक कमी झाल्यानंतर ‘न्यू नॉर्मल’मध्ये अस्वस्थतेची लाट तयार झाली. त्यातून बाहेर पडण्याचा यशस्वी मार्ग आपल्याला भगवद्गीतेने सांगितला. ‘मला कळत नाही काय करू’ अशी अवस्था धनुर्धारी अर्जुनाची महाभारताच्या युद्धभूमीवर झाली होती. भगवान श्रीकृष्ण यांनी दिलेला त्यावेळचा संदेश आजही मार्ग दाखवतो. हाच मार्ग आता आपल्यासाठी दिशादर्शक आहे.”
योगशास्त्राची कास
माणूस जसा सामाजिक असतो तसाच तो भावनिक असतो. बुद्धीबरोबरच तो मनाने विचार करतो. पण, कोरोनामुळे हे विचारचक्र खुंटले. कोरोनाचा विषाणूंचा शरीरात झालेला संसर्ग बरा होऊ शकतो. पण, त्या उद्रेकाची मनात बसलेली भीती, त्याचे आलेले दडपण कसे घालवणार, हा आता गंभीर प्रश्न झाला आहे. या सर्व गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे आपल्या भारतीय प्राचीन शास्त्रात मिळतात. योगसाधना, योगासने, योगशास्त्र यातून मनाचे आरोग्य चांगले राहाते, असे डॉ. बर्वे यांनी स्पष्ट केले.
न्यू नॉर्मल जीवनपद्धती
कोरोनाच्या भयप्रद उद्रेकानंतर आपले मानसिक संतुलन कसे राखायचे, आपले मन शांत, आनंदी, प्रसन्न आणि ध्येयाने प्रेरित कसे ठेवायचे यासाठी आपली सातत्याने धडपड सुरू आहे. हे नव्या जगातील नवं मन आहे. आपल्या न कळत आपण मानसिक चिंता, उदासीनता याला कधी बळी पडू हे सांगता येत नाही. या दृष्टीने आपण आता अत्यंत सखोल विचार करणे गरजेचे आहे. तसेच, त्या दृष्टीने योग्य पावले उचलणे आवश्यक आहे. यासाठीच ‘स्थाथ्यम्’ हा उपक्रम आहे, असेही डॉ. बर्वे यांनी सांगितले.
कंपन्यांचा सहभाग
कोरोनाच्या महाभयंकर उद्रेकात कंपनीला कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या. त्या बद्दल टाटा मोटर्सचे कार्पोरेट हेल्थ हेड डॉ. नितीन जाधव, टाटा कल्सटन्सी सर्व्हिसेसचे प्रशांत लिखिते यांनी माहिती दिली. प्राज इंडस्ट्रीजच्या ह्यूमन कॅपिटलच्या मुख्य व्यवस्थापक मंजिरी जोशी आणि सहायक सरव्यवस्थापक अर्चना तांबे पाटील आणि ‘केपीआयटी’ टेक्नॉलॉजीस कंपनीच्या शाश्वत मित्रा यांनीही चर्चेत सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ‘एमसीसीआयए’चे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी केले.
वुई आर इन धीस टुगेदर
कोरोना उद्रेक झाल्यानंतर लॉकडाऊनमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. यावर मात करण्यासाठी ‘सकाळ’ने ‘वुई आर इन धीस टुगेदर’ ही मोहीम उभी केली. ‘सकाळ’च्या संचालिका मृणाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत मानसिक आरोग्याबाबत पन्नासहून अधिक कार्यशाळा घेतल्या आहेत, अशी माहिती संपादक सम्राट फडणीस यांनी दिली. मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी ‘सकाळ’ फक्त जनजागृती करत नाही. तर, सक्रिय सहभाग घेते. नुकत्याच झालेल्या ‘सकाळ हाफ मॅरेथॉन’मध्ये सर्व आवृत्त्यांमधील साडेसातशेहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते, असेही फडणीस यांनी स्पष्ट केले.