पुणे : संभाजी महाराजांचे शौर्य, कर्तृत्व मुलांपर्यंत पोहोचावे “अवघ्या नऊ ते दहा वर्षांच्या कारकिर्दीत छत्रपती संभाजी महाराजांनी इंग्रज, पोर्तुगीज आणि मुघल तिघांशी दोन हात करत स्वराज्याचे रक्षण केले. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच शौर्य आणि कर्तृत्वाचा प्रेरणास्रोत असलेल्या संभाजी महाराजांचा इतिहास मुलांपर्यंत पोहोचायला हवा,” असे मत उरी सर्जिकल स्ट्राईकचे जनक लेफ्ट. जनरल (नि.) राजेंद्र निंभोरकर यांनी व्यक्त केले.
स्नेहल प्रकाशनातर्फे संभाजी महाराज चरित्र अभ्यासक निलेश रमेश भिसे लिखित ‘विद्यार्थ्यांचे शंभूराजे’ पुस्तकाचे प्रकाशन निंभोरकर यांच्या हस्ते झाले. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कुलच्या गणेश सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे होते. प्रसंगी नक्षलवाद्यांशी लढा पुकारणारे सामाजिक कार्यकर्ते तुषार दामगुडे, जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या अकरावे वंशज शिरीषजी महाराज मोरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह प्रवीण दबडगाव, ज्येष्ठ लेखिका वैशाली नाईकवाडे लेखक निलेश रमेश भिसे, स्नेहल प्रकाशनाचे रवींद्र घाटपांडे आदी उपस्थित होते.
राजेंद्र निंभोरकर म्हणाले, “इतिहास नीट समजला, तर आपला भूगोल सुरक्षित ठेवता येतो. त्यामुळे इतिहासाच्या पानांतून शिवाजी महाराज, संभाजी महाराज समजून घ्यावेत. वेळेचे महत्व, गनिमी कावा, धाडस, कर्तव्यनिष्ठा, स्वराज्याप्रती असलेली बांधिलकी अशा गोष्टी संभाजी महाराजांकडून शिकायला हव्यात. उरी सर्जिकल स्ट्राईक करताना आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या रणनीतीची मदत झाली. त्यांचा मृत्यू ‘मरावे कसे’ हे शिकवणारा आहे.”
अध्यक्षीय भाषणात भानुप्रताप बर्गे म्हणाले की, संभाजी महाराजांचे बलिदान, प्रचंड मरणयातना होत असतानाही निर्धाराने केलेला सामना, त्यांचे पराक्रम समजून घ्यायला हवा. देशाशी बेईमानी करणाऱ्याना धडा शिकवणाऱ्यांसाठी त्यांची शिकवण, आदर्श घेऊन काम करावे.
प्रास्ताविकात निलेश भिसे म्हणाले, “संभाजी महाराजांप्रमाणे प्रत्यक्ष पाकिस्तानात लढणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्याला, तसेच पाकिस्तानच्या तुरुंगात अनन्य यातना सहन करणारे माजी लष्करी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या धैर्याला हे पुस्तक अर्पित करत आहे.”
तुषार दामगुडे यांनी नक्षलवाद्यांशी लढताना येणाऱ्या अडचणी आणि त्यातून मार्ग काढत हे काम पुढे कसे जात आहे, याविषयी सांगितले. शिरीष महाराज मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्राज भिलारे यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र घाटपांडे यांनी आभार मानले.