शेमारू मराठीबाणा वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीस येणार स्वप्निल जोशींची लोकप्रिय मालिका श्रीकृष्ण

94

२५ नोव्हेंबर २०२२  : पौराणिक मालिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरलेली आणि अभिनेता स्वप्निल जोशीच्या अभिनयाने सजलेली ‘श्रीकृष्ण’ ही मालिका येत्या २१ नोव्हेंबरपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वा. शेमारू मराठीबाणा वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यानिमित्ताने श्रीकृष्णाच्या अगाध लीला आणि दैवी चमत्कृतींचं दर्शन आता आपल्या मराठी भाषेमधून प्रेक्षकांना होणार हे विशेष.

काही कलाकृती या अजरामर आणि कालातीत असतात. श्रीकृष्ण ही मालिकाही अशीच अजरामर कलाकृती आहे. रामानंद सागर यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या श्रीकृष्ण या हिंदी मालिकेने नव्वदच्या दशकात प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात घर केले होते. मराठीतला आजचा आघाडीचा अभिनेता स्वप्निल जोशीने यात किशोरवयीन श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती जी अत्यंत लोकप्रिय झाली होती. महाराष्ट्रातही श्रीकृष्ण ही मालिका घरोघरी बघितली जात होती. ही बाब लक्षात घेऊनच ही मालिका मराठी भाषेमध्ये आणण्याचा निर्णय शेमारू मराठीबाणा वहिनीने घेतला.

या मालिकेद्वारे श्रीकृष्ण जन्माची कथा, यशोदा मातेच्या घरातील बाल कृष्णाच्या नटखट लीला, कालियामर्दन वध, क्रूर-अत्याचारी कंस मामाचा वध, कुरुक्षेत्रावरील अर्जुनाचं सारथ्य आणि गीतेचा उपदेश अशा विविध कृष्ण लीला आपल्या मराठी भाषेत शेमारू मराठीबाणा वाहिनीवरुन बघता येणार आहेत. शेमारू मराठीबाणा ही वाहिनी डीडी फ्री डिशसह सर्व डिटीएच सेवा आणि केबल नेटवर्क वर मोफत उपलब्ध आहे.