शिक्षकांची सेवावृत्ती पिढी घडवण्याचे कार्य मौलिक: चंद्रकांत दळवी

19

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षकांची सेवाव्रती आणि विद्यार्थ्यांचे विद्याव्रती पिढी घडवण्याचे कार्य अत्यंत मौलिक असून भविष्यात ते अधिक जोमाने केले जाईल, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्रा. डॉ. बंडोपंत कांबळे आणि प्रा. भीमराव पाटील यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभात दळवी बोलत होते. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. दीपक माने, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते डॉ. कांबळे आणि प्रा. पाटील यांचा सपत्नीक यथोचित सत्कार करण्यात आला. या दोन्हीही सत्कारमूर्तींनी रयतेच्या आणि बंधूतेच्या प्रोत्साहनपर कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेला आपल्या सेवानिवृत्तीच्या रकमेतून प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांची देणगी दिली. प्राचार्य डॉ. अरुण आंधळे आणि बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी ती स्विकारली.

बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “कर्मवीर भाऊराव पाटील यांचे ‘माणूस’ तयार करण्याचे कार्य नव्या पिढीला दीपस्तंभासारखे आहे. त्यांच्याच प्रेरणेने प्रेरित होऊन मातृहृदयी असलेल्या विद्यार्थीप्रिय डॉ. कांबळे आणि प्रा. पाटील यांचे कार्य कौतुकास्पद आहे.”

डॉ. दीपक माने आणि दत्तात्रय गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयाच्या प्रगतशील कार्याची प्रशंसा केली. यावेळी रयत शिक्षण संस्थेमधील प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आणि हितचिंतक यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.

डॉ. अरुण आंधळे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. प्रा. सायली गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. तानाजी हातेकर यांनी आभार मानले. डॉ. सविता पाटील, डॉ. रमेश रणदिवे आणि डॉ. प्रभंजन चव्हाण यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.