व्यावसायिक शिक्षण प्रगतीपथावर घेऊन जाईल : प्रा. सुनील रेडेकर

75

पुणे, १७ नोव्हेंबर २०२२ : “सामाजिक, आर्थिक विकास होण्यासाठी चांगले शिक्षण घेणे गरजेचे आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात प्रगतीपथावर जायचे असेल, तर पारंपरिक शिक्षणाला व्यावसायिक शिक्षणाची जोड द्यायला हवी. ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी आपण प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा,” असे मत पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष प्रा. सुनील रेडेकर यांनी व्यक्त केले.

विविध क्षेत्रात सेवाकार्य करणाऱ्या सेवाव्रतींना परभन्ना फाउंडेशनच्या वतीने सेवाकार्य कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी पेठेतील पत्रकार भवनच्या कमिन्स सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला लोकशाही संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे पी. आर. सोनवणे, कर्वे सामाजिक संस्थेतील सीएसआर विभागाचे संचालक प्रा. डॉ. महेश ठाकूर, परभन्ना फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. गणेश चप्पलवार आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे (आरोग्य), शेतकरी युवानेता कैलास येसगे (कृषी), मधुबन कृषी पर्यटनाचे तृनीत कुथे (पर्यटन), पत्रकार रामचंद्र भंडारवार (पत्रकारिता), पोलिस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रशांत कांबळे (प्रशासन), उद्योजक तिलोकराज भालेराव (उद्योजकता), राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस भूपेंद्र मोरे (राजकारण), अभिनेता कपिल कांबळे (सांस्कृतिक), राईट टू लव्हचे के. अभिजित (सामाजिक), अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब चौगुले (शैक्षणिक), लेखक व पर्यावरण अभ्यासक बसवंत विठाबाई बाबाराव (पर्यावरण) यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सुनील रेडेकर म्हणाले, “पुणे विद्यार्थी गृहाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब, गरजू व होतकरू मुलांना शिक्षण देऊन घडविले जाते. ११३ वर्षांचा हा ज्ञानदानाचा हा वारसा पुढे नेत आहोत. शिक्षणच आपल्याला तारणार असून, त्याला मूल्यांची व संस्कारांची जोड मिळाली, तर भारतातील तरुण पिढी आणखी प्रगती करू शकेल.”

पी. आर. सोनावणे म्हणाले, “भारतीय संविधानाने आपल्याला न्याय व सन्मानाने जगण्याचा अधिकार दिले आहेत. त्याचबरोबर काही कर्तव्येही सांगितली आहेत. संविधान अबाधित ठेवण्याचे प्रत्येकाचे दायित्व आहे. या देशातील आदिवासींना, मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणून प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याची संधी संविधानाने दिली आहे.”

आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असलो, तरी आपल्यातील सामाजिक बंधुभाव जपायला हवा. समाजाच्या समस्या सोडवण्यात माझे काय योगदान असू शकेल, असा विचार करून प्रत्येकाने काम केल्यास अनेक प्रश्न सुटतील, असे प्रा. डॉ. महेश ठाकूर म्हणाले.

गणेश चप्पलवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विजय गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. गणेश काळे यांनी आभार मानले